Arvind Kejriwal vs Pm Narendra Modi: मोफत रेवड्या वाटून मते गोळा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मोदींच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला. मुलांना मोफत शिक्षण आणि लोकांना मोफत उपचार देणे याला रेवड्या वाटणं म्हणत नाहीत, असा सणसणीत टोला अरविंद केजरीवाल यांनी मोदींना लगावला.
"१८ लाख मुले सरकारी शाळांमध्ये शिकतात. देशभरातील सरकारी शाळांची जी वाईट अवस्था होती, त्यासारखीच अवस्था दिल्लीतील शाळांची होती. १८ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात होते. अशा गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं हा माझा गुन्हा आहे का? आपल्या देशातील विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देणं तसेच गरजू लोकांवर मोफत उपचार करणं याला फुकट रेवड्या वाटणं म्हणत नाहीत. आम्ही एका विकसित आणि गौरवशाली भारताचा पाया निर्माण करण्यासाठी धडपडत आहोत. खरं तर हे काम ७५ वर्षांपूर्वीच व्हायला हवं होतं", अशा शब्दांत केजरीवाल यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं.
"नेतेमंडळींना लोकांना ४ ते ५ हजार युनिट वीज मिळाली तर चालते. पण गरीब जनतेला २०० ते ३०० यूनिट वीज मिळत असेल तर त्याची तुम्हाला अडचण का वाटते? दिल्ली हे असे एकमेव शहर आहे जेथे २ करोड गरजू लोकांचे मोफत उपचार होतात. आम्ही या योजनांच्या मार्फत सुमारे १३ हजार लोकांचे जीव वाचवले आहेत. त्या लोकांच्या कुटुंबीयांना जाऊन विचारा की केजरीवाल फुकटच्या रेवड्या वाटतोय की पुण्यकर्म करतोय", असेही केजरीवाल यांनी ठणकावून सांगितले.
“एका कंपनीने अनेक बँकांकडून कर्ज घेऊन पैसे खाल्ले. बँक दिवाळखोरीत निघाली आणि त्या कंपनीने काही कोटी रुपये एका राजकीय पक्षाला दिले आणि सरकारने त्या कंपनीवर कोणतीही कारवाई केली नाही. तेव्हा तुम्ही परदेशात तुमच्या मित्रांसाठी गेला होतात", असा टोलाही त्यांनी लगावला.