नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात सोमवारी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराला जोर धरला आहे. आम आदमी पार्टीचे (आप) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातील आपचे उमेवार दिलीप पांडे यांच्या प्रचारार्थ रोड शो केला. यावेळी त्यांनी भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी यांच्यावर निशाणा साधला.
रोड शो दरम्यान जनतेला संबोधिक करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मनोज तिवारी गेल्या पाच वर्षांपासून मतदार संघातून गायब आहेत. पाच वर्षात लोक त्यांना भेटू शकले नाहीत. त्यांनी एकही शाळा आणली नाही. रस्ते बांधले नाहीत किंवा ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची सुविधा उपलब्ध करुन दिली नाही. आता मतदान करण्यासाठी जाताना विचार करा आणि तुमच्यासोबत राहून जो काम करु शकेल त्याला मत द्या. दिलीप पांडे तुमच्यासाठी नाचू शकणार नाहीत. मात्र, तुमच्या भागात काम जरुर करतील. मनोज तिवारी चांगले नाचतात. दिलीप पांडे यांना नाचता येत नाही, मात्र काम करता येते. त्यामुळे काम करणाऱ्याला मत द्या, नाचणाऱ्याला देऊ नका.'
दरम्यान, उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातून आपचे उमेदवार दिलीप पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला दिलसेंदिवस रंगत येत आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.