नवी दिल्ली - आमच्या मागण्यांकडे दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल साफ दुर्लक्ष करत असून त्यामुळे त्यांच्या कार्यालयामध्ये धरणे धरण्याशिवाय मला व माझ्या मंत्र्यांना दुसरा पर्याय उरलेला नव्हता, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे. सोमवार संध्याकाळपासून सुरू झालेले धरणे आंदोलन यापुढेही कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.केजरीवाल, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व आपचे अन्य मंत्री या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांंना १९ फेब्रुवारीच्या रात्री झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून तेथील आयएएस अधिकाऱ्यांनी सुरू केलेला अंशत: स्वरूपातील संप मागे घ्यावा, असा आदेश नायब राज्यपालांनी द्यावा, अशी विनंती आप सरकारने त्यांना २३ फेब्रुवारी रोजी केली होती. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्षच केले. मात्र केजरीवालांनी विनाकारण धरणे धरले आहे, अशी टीका नायब राज्यपालांनी केली आहे.दिल्लीत मोहल्ला दवाखाने उघडावेत, अनधिकृतरीत्या बांधलेल्या वस्त्यांमध्ये गटारांची बांधणी करावी अशा काही मागण्यांसाठी आम्ही नायब राज्यपालांची भेट घेतली. त्यांना पत्रेही लिहिली. पण ते कोणताच निर्णय घेण्यास तयार नाहीत, असे केजरीवाल म्हणाले.केजरीवाल यांनी म्हटले आहे की, दिल्लीकरांना सुविधा मिळण्यासाठी व सरकारी कामकाज पुन्हा सुरळीत सुुरू होण्यासाठी हे धरणे आंदोलन करणे आवश्यकच होते....तर भाजपाचा प्रचार करेनभाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिल्यास या निवडणुकीत मी स्वत: भाजपाचा प्रचार करेन, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील प्रस्तावावर विधानसभेत झालेल्या चर्चेच्या वेळी ते म्हणाले, भाजपाने जर असा निर्णय घेतला नाही, तर दिल्लीकर या पक्षाची सत्तेतून व या शहरातून हकालपट्टी करतील.
नायब राज्यपालांच्या कार्यालयात केजरीवालांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 5:44 AM