दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने नवव्यांदा समन्स पाठवल्यानंतर राज्याच्या अर्थमंत्री आतिशी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन तपास यंत्रणांसह मोदी सरकारवर सवाल उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून आणखी एक समन्स मिळाला असून त्यांना दिल्ली जल बोर्डाशी संबंधित काही तपासात सहभागी होण्यास सांगितलं आहे. आम्ही याबाबत अनभिज्ञ आहोत. अरविंद केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे.
आतिशी पुढे म्हणाल्या की, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल न्यायालयात हजर झाले कारण त्यांनी सांगितलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर ते स्वतः न्यायालयात जातील कारण आप कायदा आणि न्यायालयाचा आदर करतात. त्या पुढे म्हणाल्या की, केजरीवाल कोर्टात जात नाहीत, असे भाजपा नेते म्हणायचे, त्यांनी या नेत्यांना गप्प केलं. आता ईडीकडून पाठवले जाणारे समन्स कायदेशीर की बेकायदेशीर यावर न्यायालयात चर्चा होणार आहे.
केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना आतिशी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींना फक्त निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकायचं आणि त्यांना प्रचारापासून रोखायचं आहे. यामुळेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू होताच ती संपण्याची वाट पाहिली नाही काही तासांतच ईडीने केजरीवाल यांना आणखी एका खोट्या प्रकरणात समन्स पाठवले. जल बोर्डाचे प्रकरण कोणते आणि त्यात कोणते आरोप आहेत हे कळू शकलेले नाही. यामध्ये काय तपास सुरू आहे आणि हा घोटाळा आहे का, याचीही आम्हाला माहिती नाही.
आतिशी पुढे म्हणाल्या की, जर ही प्रक्रिया तपास आणि न्यायासाठी होती तर मोदींचे ईडी सध्या सुरू असलेले न्यायालयीन प्रकरण संपण्याची वाट का पाहू शकत नाही? तपास, न्याय आणि सत्यापर्यंत पोहोचणे हा त्यांचा उद्देश नसून केवळ अरविंद केजरीवाल यांना अटक करणे हा त्यांचा उद्देश आहे. आज ईडी आणि सीबीआय नरेंद्र मोदींचे गुंड बनले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत पूर्वी जे व्हायचे तेच आता वास्तवात घडत आहे. जो मोदींना विरोध करतो, ईडी आणि सीबीआय त्यांच्या मागे लागतात. मोदींच्या या दोन गुंडांनी विरोधी पक्ष आणि नेत्यांना टार्गेट केलं आहे.