नवी दिल्ली : यंदा केंद्रामध्ये कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळणे शक्य नाही. त्यामुळे भाजप वगळता आम्ही अन्य कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देऊ. नरेंद मोदी-अमित शहा यांच्या जोडीला सत्तेतून हटविण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्ला चढविला.‘आम आदमी पार्टी’ने दिल्लीसाठी आपला निवडणूक जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध केला. त्यावेळी केजरीवाल म्हणाले की, या लोकसभा निवडणुका देश वाचविण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पाकिस्तानला भारताचे तुकडे व्हावेत, असे वाटत असून, तेच भाजप करत आहे.
दिल्लीतील जनतेची दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी इच्छा आहे, असे सांगून केजरीवाल म्हणाले, पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यास महापालिका राज्य सरकारच्या अखत्यारीत असतील. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी अधिक स्वच्छ केली जाईल. पूर्ण राज्याचा दर्जा मिळताच एका आठवड्यात हंगामी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले जाईल. तसेच अतिथी शिक्षकांनाही कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल.आपने जाहीरनाम्यात म्हटले आहे की, पूर्ण राज्याचा दर्जा मिळताच जनलोकपाल विधेयक मंजूर केले जाईल. भ्रष्टाचारावर पूर्णपणे पर अंकुश आणला जाईल. शिवाय सर्व मतदारांना स्वस्त आणि सुलभ हप्त्यांमध्ये घर दिले जाईल. अधिकारांच्या मुद्द्यावरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकारमध्ये वाद होत असतात. या पार्श्वभूमीवर आपने दिल्लीस पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला मुख्य मुद्दा बनवला आहे. जोपर्यंत पूर्ण राज्याचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत दिल्लीची शासनव्यवस्था नीट चालणे अवघड आहे, असे केजरीवाल म्हणाले.
प्रत्येकास स्वत:चे घरजाहीरनाम्यात रोजगार, उच्च शिक्षण, महिला सुरक्षासह अनेक मुद्दे समाविष्ट आहेत. आम आदमी पक्ष दिल्लीतील प्रत्येक नागरिकास स्वत:चे घर देणार आहे. दोन लाख युवकांना रोजगार, महाविद्यालयांमध्ये सहज प्रवेशासाठी ८५ टक्के आरक्षण, पोलीस दल दिल्ली सरकारच्या अधीन आल्यास सुरक्षिततेची हमी, ‘सीलिंग’वर बंदी, अनधिकृत वसाहतींमध्ये विकास आदी आश्वासने जाहीरनाम्यात आहेत.