Arvind Kejriwal surrender : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 21 दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज तिहार तुरुंगात अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. "आम आदमी पार्टी महत्त्वाची नाही, देश महत्त्वाचा आहे. देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहोत. मी हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला आहे, म्हणून मला कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकले, ही हुकूमशाही आहे," अशी टीका केजरीवालांनी केली.
ते पुढे म्हणतात, "ही निवडणूक देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे. एक्झिट पोलबद्दल घाबरण्याची गरज नाही, ते सर्व खोटे आहेत. भाजपला जास्त जागा दाखवण्याचे आदेश वरुन आले असतील. त्या बनावट एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, विजय आपलाच होणार आहे. आपल्या प्रत्येकाला लढायचे आहे. ही निवडणूक कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी नाही, ही निवडणूक या देशाला वाचवण्यासाठी आहे. भगतसिंग म्हणाले होते की, जेव्हा सत्ता हुकूमशाही बनते, तेव्हा जेल ही जबाबदारी असते. तुरुंगात ते माझ्यासोबत काय करतील माहीत नाही. भगतसिंग यांना फाशी झाली, ते मलादेखील फाशी द्यायला कमी करणार नाहीत."
"मला माहित नाही की, मी तुरुंगातून परत कधी येईन. पण माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी आहे. ईव्हीएमवर लक्ष ठेवा, उमेदवार हरला तरी तुम्ही तिथेच रहा. व्हीव्हीपीएटी स्लिप मशीनशी जुळली नाही, तर निवडणूक रद्द होते. आपण सतर्क राहिले पाहिजे. दाखवण्यात आलेले एक्झिट पोल खोटे आहेत. आम्ही 100 कोटींची लाच घेतली असेल, तर ते पैसे गेले कुठे? त्यांना आमच्याकडून एक रुपयाही मिळाला नाही. देशाच्या इतिहासात सर्वाधिक बहुमताने आलेल्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यात आले," असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणतात, "त्याच्या मित्रांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत, एक्झिट पोलनंतर बाजार वर जाईल आणि ते पैसे कमावू शकतील, त्यामुळे खोटे एक्झिट पोल दाखवले जात आहेत. हे लोक अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांची हेराफेरी करू शकतात. म्हणूनच मी इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांना सांगू इच्छितो की, अंतिम मतमोजणी होईपर्यंत तिथेच रहा, जेणेकरून ते फेरफार करू शकणार नाहीत.