नवी दिल्ली : दिल्लीतील महिलांकडून राज्य सरकारने सुरू करण्यात आलेल्या मोफत प्रवास योजनेचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दिल्ली परिवहन निगमच्या (डीटीसी) बसमधून प्रवास केला. डीटीसीकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मोफत प्रवास योजना सुरु केल्यानंतर पहिल्या दिवशी जवळपास 4.77 लाखहून अधिक महिलांनी मोफत प्रवास केला.
अरविंद केजरीवाल यांनी आज डीटीसी बसमधून प्रवास करून या योजनेबद्दल मतं जाणून घेतली. विद्यार्थी, खरेदी आणि कामावर जाणाऱ्या महिला यांच्याशिवाय नियमितरित्या वैद्यकीय तपासणीसाठी महिलांसोबत चर्चा केली. यावेळी त्या खूप आनंदी असल्याचे दिसून आले, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. याचबरोबर, अरविंद केजरीवाल यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणाले, "आज आपल्या दिल्लीतील सर्व महिला व्हिआयपी बनल्या आहेत. आतापर्यंत फक्त खासदार आणि आमदारांना मोफत प्रवासाची सुविधा मिळत होती. आता सर्व महिलांनाही मोफत प्रवासाची सुविधा मिळत आहे."
दरम्यान, डीटीसी बसमधून मोफत प्रवास योजनेला दिल्लीकर महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. भाऊबीजपासून ( २९ ऑक्टोबर) संपूर्ण दिल्लीत महिलांसाठी मोफत प्रवास योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नव्या योजनेचे लोकार्पण करताना अरविंद केजरीवाल यांनी ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनादेखील मोफत प्रवास देण्याचे संकेत दिले. केजरीवालांच्या घोषणेमुळे विरोधकांच्या अस्वस्थतेत वाढ झाली आहे.