दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जामीन मिळाल्यानंतर सातत्याने प्रचार करत आहेत. याच दरम्यान, आज केजरीवाल निवडणूक प्रचारासाठी हरियाणातील कुरुक्षेत्रमध्ये पोहोचले, तिथे त्यांनी भाजपावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला.
हरियाणातील कुरुक्षेत्र येथे रोड शो दरम्यान अरविंद केजरीवाल म्हणाले की, "मला प्रचारासाठी 20 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. मला प्रचारासाठी जामीन मिळाला हा देवाचा चमत्कार होता. तुम्ही लोकांनी कमळाचं बटण दाबलं तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल. जर तुम्ही झाडूचं बटण दाबलं तर मी जेलमध्ये जाणार नाही."
"केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या दिल्ली पोलिसांनी हरियाणातील शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकले. त्यांनी आमच्या कुस्तीपटू मुलींशी गैरवर्तन केले. हरियाणातील लोकांनी बांगड्या घातलेल्या नाहीत. ते याचं उत्तर देतील. या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होत आहे. भाजपाला 230 पेक्षा जास्त जागा मिळत नाहीत. मोदी सरकार परत येणार नाही."
"आज मी तुम्हाला गॅरंटी देऊन जात आहे. मी दिल्लीमध्ये दिलेली गॅरंटी पूर्ण केली आहे. पहिली गॅरंटी म्हणजे 4 जून रोजी इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल. दुसरी गॅरंटी संपूर्ण देशात 24 तास मी गरीबांसाठी मोफत वीज व्यवस्था करीन. देशभरातील प्रत्येक गावात उत्कृष्ट सरकारी शाळा बांधणार आहे."
"मी अशा शाळा बनवीन की मुलांना खासगी शाळांमधून काढून सरकारी शाळेत प्रवेश घ्याल. देशभरातील प्रत्येक गावात मोहल्ला क्लिनिक बांधले जातील. आम्ही प्रत्येक जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट सरकारी नागरी रुग्णालये बांधू आणि या देशात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला पूर्णपणे मोफत उपचार देऊ."
"हीच खरी राष्ट्र उभारणी आहे. आम्ही चीन आणि पाकिस्तानने ताब्यात घेतलेली जमीन परत आणू. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे" असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.