लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय संयोजकपदी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सलग तिसऱ्यांदा निवड करण्यात आली. पंकज गुप्ता आणि एन. डी. गुप्ता यांची अनुक्रमे सचिव आणि कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पाच वर्षांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शनिवारी ३४ सदस्यांनी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात केजरीवाल यांचाही समावेश आहे. रविवारी आम आदमी पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या व्हर्च्युअल बैठकीत राष्ट्रीय संयोजक, राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय कोषाध्यक्षांच्या नियुक्ती ठराव मांडण्यात आला.
कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी सर्वसंमतीने पक्षाचे वरिष्ठ नेते अरविंद केजरीवाल यांची राष्ट्रीय संयोजकपदी निवड करण्यास सहमती दिली. कार्यकारिणीच्या सदस्यांनी सर्वसंमतीने पंकज गुप्ता यांची राष्ट्रीय सचिवपदी आणि एन. डी. गुप्ता यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी निवड केली. कार्यकारिणी सदस्यांत वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, इम्रान हुसैन, राजेंद्र पाल गौतम, राघव चड्ढा, आतिशी, राखी बिडला यांच्यासह इतरांचा समावेश आहे.