नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सत्ताधारी पक्ष आपने रविवारी ३८ उमेदवारांची शेवटची यादी प्रसिद्ध केली. ‘आप’चे प्रमुख व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघातून, तर मुख्यमंत्री आतिशी यांना पुन्हा कालकाजी विधानसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
राजधानीत लागोपाठ तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी ‘आप’ने कंबर कसली असून, निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आपने बहुतांश वरिष्ठ नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मंत्री सौरभ भारद्वाज, गोपाल राय, इमरान हुसैन, रघुविंदर शौकीन व मुकेश कुमार अहलावत यांना ‘आप’ने अनुक्रमे ग्रेटर कैलाश, बाबरपूर, बल्लीमारान, नांगलोई जाट व सुल्तानपूर माजरा येथून उमेदवारी दिली आहे.
भाजप नेते रमेश पहलवान ‘आप’मध्ये
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते रमेश पहलवान व दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या त्यांच्या पत्नी कुसुम लता या दोघांनी रविवारी ‘आप’मध्ये प्रवेश केला. अरविंद केजरीवाल यांनी रमेश व त्यांच्या पत्नीचा पक्षात प्रवेश करून घेतला.
काँग्रेसने २१ उमेदवारांची घोषणा केली असून, माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांचा समावेश आहे. ते नवी दिल्लीत केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.
आमचा पक्ष पूर्ण आत्मविश्वास व तयारीसह निवडणुका लढवत आहे. भाजपचा काही पत्ता नाही. त्यांच्याकडे ना मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा आहे, ना टीम, ना नियोजन, ना दिल्लीसाठी कोणतेही व्हिजन आहे. त्यांच्याकडे फक्त एकच घोषणा, एकच धोरण आणि एकच मिशन आहे - ‘केजरीवाल हटवा’. त्यांना पाच वर्षांत काय केले असे विचारल्यास उत्तर मिळते, ‘केजरीवालला खूप शिव्या दिल्या’. - अरविंद केजरीवाल, आप.