दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये सरेंडर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांचा अंतरिम जामीन दिल्याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज तिहारला जाऊन सरेंडर करणार आहे. मी दुपारी ३ वाजता घरातून निघेन."
"घरातून बाहेर पडल्यानंतर मी सर्वप्रथम राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहणार आहे. तेथून मी हनुमानजींचा आशीर्वाद घेण्यासाठी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाईन. हनुमान मंदिरात प्रार्थना केल्यानंतर मी पक्ष कार्यालयात जाऊन सर्व कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या नेत्यांची भेट घेणार आहे. त्यानंतर तिथून तिहारसाठी रवाना होईल" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये दिल्लीतील लोकांना स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं आहे. "मला तिहार जेलमध्ये तुम्हा सर्वांची चिंता असेल. तुम्ही खूश असाल तर जेलमध्ये तुमचे केजरीवाल खूश राहतील" असं देखील म्हटलं आहे. १० एप्रिल २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला दिले होते.
"मी तिहार जेलमध्ये जाईन, मला माहीत नाही की ते मला तिहार जेलमध्ये किती काळ ठेवतील. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी जेलमध्ये जात आहे. "इन्सुलिनची इंजेक्शन दिवसातून चार वेळा दिली जातात. जेलमध्ये त्यांनी अनेक दिवस माझं इंजेक्शन बंद केलं, माझी शुगर ३००-३२५ पर्यंत पोहोचली. इतके दिवस शुगर हाय राहिली तर किडनी आणि लिव्हर खराब होतात. त्यांना काय हवं होतं, त्यांनी असं का केलं ते माहीत नाही."
"मी ५० दिवस जेलमध्ये होतो आणि या ५० दिवसांत माझं वजन ६ किलो कमी झाले. मी जेलमध्ये गेलो तेव्हा माझं वजन ७० किलो होतं, आज ते ६४ किलो आहे. जेलमधून सुटल्यानंतरही माझं वजन वाढत नाही. शरीरात काही मोठा आजार असण्याची शक्यता असून अनेक तपासण्या कराव्या लागतील, असं डॉक्टर सांगत आहेत. युरीनमध्ये कीटोनचे प्रमाण खूप वाढलं आहे. कदाचित यावेळी ते मला आणखी छळतील. पण मी झुकणार नाही" असं याआधी अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.