नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत आयोजित विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपच्या आमदारांना मणिपूरची चिंता नाही, म्हणूनच त्यांनी विधानसभेतून काढतापाय घेतला. मणिपूरच्या लोकांना काय वाटत असेल. मणिपूरच्या घटनेवर पंतप्रधान मौन बाळगून आहेत. पंतप्रधान मोदींनी किमान शांततेचे आवाहन करायला हवे होते, पण ते तेवढंही करत नाहीत, अशी टीका केजरीवालांनी केली.
केजरीवाल पुढे म्हणतात, मणिपूरमध्ये 4 हजार घरे जाळली गेली, 60 हजार लोक बेघर झाले, 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, साडेतीनशे धार्मिक स्थळे जाळली, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांमध्ये गोळीबार झाला, जगभर भारताची थू-थू झाली, पण भारताचे पंतप्रधान गप्प राहिले. महिलांवर अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला, तरीदेखील पंतप्रधान गप्प होते. मणिपूरचे मुख्यमंत्री सांगतात की, तिथे रोजच अशा घटना घडत आहेत, तरीदेकील पंतप्रधान शांत बसतात.
भाजपचे लोक जवाहरलाल नेहरूंना शिव्या देतात, पण निदान जवाहरलाल नेहरू चीनच्या डोळ्यात डोळे घालून लढले होते. मला देशातील जनतेला विचारायचे आहे की, तुम्हाला देशाचा आदर करणारा पंतप्रधान हवा आहे की व्यवसाय करणारा पंतप्रधान हवा आहे. हात धरुन मंदिरात नेल्याने डिप्लोमसी होत नाही, त्यासाठी डोळे दाखवावे लागतात. आज चीन आव्हान देत आहे, पण पंतप्रधान गप्प आहेत. 2020 मध्ये चीनने गलवानमध्ये भारतीय जमीन ताब्यात घेतली, पण पंतप्रधान गप्प आहेत, अशीही टीका त्यांनी यावेळी केली.
विधानसभेत अदानीचा मुद्दा उपस्थित करत केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधानांनी किमान हिंडेनबर्ग अहवालाबाबत ट्विट करायला हवे होते. अदानी मुद्द्यावर मोदी गप्प आहेत. जनतेचा पैसा बुडाला, पण पंतप्रधान गप्प राहिले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांना देशातून देशातून पळवून लावण्यात आले. आरबीआयच्या माहितीनुसार, 16000 डिफॉल्टर आहेत, त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय कारवाई का करत नाहीत? लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांवर जीप चालवली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प राहिले. हाथरसमध्ये दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, पण पंतप्रधान गप्प राहिले. हे दुबळे, अहंकारी आणि भ्रष्ट पंतप्रधान आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.