नवी दिल्ली: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant maan) यांनी त्यांच्याच मंत्र्यावर केलेल्या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भगवंत मान यांच्या या निर्णयाचे कौतुक करताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, "भगवंत मान यांचा आम्हाला अभिमान आहे. आम आदमी पक्ष आपले मुंडके छाटून घेईल, पण देशाशी गद्दारी कधीच करणार नाही."
'मान यांचा देशाला अभिमान'मीडियाशी संवाद साधताना सीएम केजरीवाल म्हणाले की, "पंजाबमधील या भ्रष्टाचाराची कोणालाही माहिती नव्हती. याची माहिती ना विरोधकांना होती ना मीडियाला. भगवंत मान यांना हवं असतं तर त्यांनी मंत्र्यांकडून स्वत:साठी वाटा मागितला असता. आत्तापर्यंत असे व्हायचे. मान यांना हवं असतं तर ते प्रकरण दाबू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनीच आपल्या मंत्र्यावर कारवाई केली. भगवंत, संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे."
ते पुढे म्हणाले की, ''2015 मध्ये दिल्लीत आपचे सरकार स्थापन झाले, तेव्हा मी माझ्या अन्नमंत्र्यांवर अशीच कारवाई केली होती. त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आले होते. तेव्हाही कोणालाच माहिती नव्हती, पण मी स्वतः त्यांच्यावर कारवाई केली. आम आदमी पार्टी हा कट्टर प्रामाणिक पक्ष आहे. भ्रष्टाचार करणाऱ्याला सोडलं जाणार नाही. आपल्याच लोकांच्या भ्रष्टाचारावर कारवाई करत असल्याचे प्रथमच घडत आहे."
भगवंत मान यांची मंत्र्यांवर कारवाईपंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या विजय सिंगला यांची मंगळवारी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पंजाब सरकारमध्ये आरोग्यासारख्या महत्त्वाच्या खात्याचे ते मंत्री होते. पंजाब सरकारच्या या कारवाईनंतर काही वेळातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंगला यांच्यावरही कारवाई केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सूचनेवरून एसीबीने विजय सिंगला याला अटक केली आहे.