वडोदरा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या गुजरातमध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. मंगळवारी ते निवडणूक प्रचारासाठी वडोदरा येथे आले. यावेळी विमानतळावर येताच एक विचित्र घटना पाहायला मिळाली. केजरीवाल यांच्या स्वागतासाठी आलेल्या काही कार्यकर्त्यांनी अचानक ‘मोदी-मोदी’च्या घोषणा सुरु केल्या. हे पाहून तिथे उभ्या असलेल्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घाईघाईत ‘केजरीवाल-केजरीवाल’च्या घोषणा दिल्या. हे दृष्य पाहून अरविंद केजरीवाल हसत-हसत तेथून निघून गेले.
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज गुजरातमधील वडोदरा येथे एक दिवसीय दौऱ्यावर पोहोचले. वडोदरा येथील टाऊन हॉलमध्ये केजरीवाल सभेला संबोधित करतील. दरम्यान, भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी विमानतळावरील घटनेवर प्रतिक्रिया दिली. भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी ट्विट केले, "अरविंद केजरीवाल यांचे मोदींच्या गुजरातमध्ये हार्दिक स्वागत!!"
गेल्या निवडणुकीत 'आप' अपयशीआम आदमी पार्टी गुजरातमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आले नव्हते. पंजाबमध्ये मोठ्या विजयानंतर पक्ष देशाच्या इतर भागातही पाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरातमधील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी अरविंद केजरीवाल भाजपच्या 27 वर्षांच्या सत्तेला लक्ष्य करत आहेत. तसेच, राज्यातील जनतेला दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली जाईल, असेही म्हटले आहे.