सध्या दिल्लीच्या राजकारणात गाजत असलेल्या दिल्ली मद्यधोरण घोटाळ्यामध्ये आम आदमी पक्ष अधिकाधिक अडचणीत सापडत चालला आहे. दरम्यान या कथित घोटाळ्यातील एका प्रकरणात चौकशी केल्यानंतर ईडी २ नोव्हेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करेल, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. तसेच भाजपा आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना तुरुंगात टाकून पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात येत आहे.
दिल्ल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरजीवाल यांना पीएमएलए कायद्यांतर्गत समन्स बजावण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडी २ नोव्हेंबर रोजी ११ सकाळी वाजता केजरीवाल तपास यंत्रणांच्या कार्यालयात हजर राहणार असून, तिथे त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. ईडीने केजरीवाल यांना समन्स पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी सीबीआयने या प्रकरणात केजरीवाल यांची चौकशी केली होती.
दरम्यान, दिल्लीच्या कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भाजपा आम आदमी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी या हातखंड्यांचा वापर करत आहे. कारण निवडणुकांमध्ये केजरीवाल यांना पराभूत करता येणार नाही, याची त्यांना जाणीव आहे. केजरीवाल यांना २ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात येईल, असं वृत्त आहे. मात्र या कारवाईमागे भ्रष्टाचार नसेल तर भाजपाविरोधात बोलणं हे मुख्य कारण असेल, असा दावा आतिषी यांनी केला आहे.
आतिषी यांनी सांगितले की, केजरीवाल यांना अटक केल्यानंतर भाजपा सीबीआय आणि ईडीचा वापर करून इंडिया आघाडीतील इतर नेते आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करेल. यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लक्ष्य केलं जाईल. कारण त्यांना पराभूत करता आलेलं नाही. नंतर ते तेजस्वी यादव यांना लक्ष्य करतील. कारण भाजपाला बिहारमध्ये महाआघाडी फोडता आलेली नाही. मग केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि नंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनाही लक्ष्य केले जाईल, असा दावा आतिशी यांनी केला.