Delhi Exit Poll 2020: दिल्लीत पुन्हा केजरीवालच! भाजपाच्या पदरी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 06:34 AM2020-02-09T06:34:40+5:302020-02-09T06:36:28+5:30

७0 पैकी ५६ जागांवर ‘आप’ । एक्झिट पोलचा निष्कर्ष, भाजपला १४ तर काँग्रेसला शून्य

Arvind Kejriwal win again in Delhi! | Delhi Exit Poll 2020: दिल्लीत पुन्हा केजरीवालच! भाजपाच्या पदरी पराभव

Delhi Exit Poll 2020: दिल्लीत पुन्हा केजरीवालच! भाजपाच्या पदरी पराभव

Next

टेकचंद सोनवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशाचे सरकार राजधानी दिल्लीत असले, तरी दिल्लीत कोणाचे सरकार हे ठरविण्यासाठी शनिवारी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सरासरी ५८ टक्के मतदान झाले. निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार असला, तरी जवळपास सर्व मतदानोत्तर चाचण्यांतून तिथे पुन्हा आम आदमी पक्षालाच बहुमत मिळेल, असे अंदाज वर्तविले आहेत.


विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या एक्झिट पोलची सरासरी काढल्यास दिल्लीतील ७0 जागांपैकी आम आदमी पक्षाला ५६ जागांवर विजय मिळेल, असे दिसते. गेल्या वेळी आपला ६७, तर भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या. आपच्या जागा यंदा कमी होणार असल्या, तरी त्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे दिसते. गेल्या वेळी एकही जागेवर विजय मिळवू न शकणाऱ्या काँग्रेसला यंदाही खाते उघडता येणार नाही, असे एक्झिट पोल सांगतात. त्यामुळे देशाच्या राजधानीत सलग तिसऱ्यांदा सत्तास्थापनेचा मान अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मिळू शकेल. आतापर्यंत दिल्लीत असे एकदाही झालेले नाही.
सर्वच वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षालाच मोठे बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या खासदारांची रात्री उशिरा बैठक घेऊन चर्चा केली. या बैेठकीला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, वरिष्ठ नेते विजय गोयल, प्रकाश जावडेकर, नित्यानंद राय आदी नेते उपस्थित होते.

राष्ट्रीय मुद्द्यांना नाकारले...
दिल्लीकरांनी राष्ट्रीय मुद्द्यांना नाकारले. आम आदमी पक्षाने भर दिलेल्या विकास, पाणी, वीज व शिक्षण याच मुद्द्यांना मतदारांनी पसंती दिली, असे हे एक्झिट पोल सांगतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वारंवार शाहीनबाग, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, कलम ३७० पुढे करून दिल्लीकरांना राष्ट्रीयत्वाची साद घातली होती. त्यांनी मोठ्या सभाही घेतल्या.


भाजपचे सारेच नेते उतरले प्रचारात
दिल्लीकरांनी राष्ट्रीय मुद्द्यांना भाजपचे २०० हून अधिक खासदार दिल्लीत प्रचार करीत होते. महाराष्ट्रासह १४ राज्यांमधून भाजपचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, प्रदेशाध्यक्ष यांना दिल्लीची जबाबदारी देण्यात आली होती. भाजपचे सर्वच स्तरांतील नेते दिल्लीच्या गल्लीबोळात पत्रके वाटताना दिसत होते.
मायक्रोमॅनेजमेंट निष्प्रभ
पण आम आदमी पक्षाचे नेटवर्क व केजरीवाल यांच्या प्रतिमेमुळे भाजपचे मायक्रोमॅनेजमेंट निष्प्रभ ठरले, असे एक्झिट पोलमधून दिसते.

मतदानाच्या प्रमाणात ७ टक्क्यांची घट
राजधानीचे तख्त कुणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर मतदान यंत्रांमध्ये बंद झाले. मात्र, मतदानावेळी काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री, सिनेकलाकारांनी मतदान केले.
दिल्लीत सरासरी ५७.२९ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा निरुत्साह होता. सर्वांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मागील निवडणुकीत ६७ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. यंदा त्यात सात टक्क्यांची घट झाली. मतदान झाल्यावर सर्वच राजकीय पक्षांमध्ये घटलेल्या मतदानाचा फायदा, नुकसान कुणाला, याची चर्चा रंगली होती.

आचारसंहितेचे उल्लंघन
थंडीचा कडाका वाढल्याचा परिणाम मतदारांवर झाला. दुपारनंतर मतदार घराबाहेर पडले. सर्वच राजकीय पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. बंदी असतानाही राजकीय पक्षांतर्फे सोशल मीडियावरून प्रचार सुरू होता. हे आचारसंहितेचा उल्लंघन असल्याने निवडणूक आयोगाने दखल घेऊ न कारवाईचे संकेत दिले.


मतदारांना पैसे वाटल्याच्या तक्रारी
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या वादग्रस्त व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली. रिठाला मतदारसंघात गिरीराज सिंह मतदारांना पैसे वाटत होते, असा आरोप आम आदमी पक्षाने केला, तर दागिन्यांची खरेदी करीत होतो, असे स्पष्टीकरण गिरीराज सिंह यांनी दिले. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला होता. गिरीराज सिंह यांना दागिन्यांच्या दुकानातच रोखण्यात आले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यांची सुटका झाली. शनिवारी दिवसभर त्याचीच चर्चा होती.

Web Title: Arvind Kejriwal win again in Delhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.