Raghav Chadha on Arvind Kejriwal Resignation: नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढील दोन दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. यावरून दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिवार या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या डॉयलॉगचा उल्लेख करत मेरा केजरीवाल ईमानदार हैं, असे दिल्लीतील जनता आपल्या हातावर लिहिल, असे राघव चड्ढा यांनी म्हटले आहे.
रविवारी राघव चड्ढा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले. त्यांनी आपल्या प्रामाणिकपणाची परीक्षा आणि अग्निपरीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीची जनता झाडूचे बटण दाबून अरविंद केजरीवाल यांना प्रामाणिक घोषित करेल. तसेच, २०२५ च्या निवडणुकीत दिल्लीची जनता अरविंद केजरीवाल यांना प्रामाणिक ठरवेल. जसे की, दिवार या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या हातात जे लिहिले होते, त्याच्या उलट दिल्लीतील जनता आपल्या हातात लिहिल की, मेरा केजरीवाल ईमानदार हैं, असे राघव चड्ढा यांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर आज अरविंद केजरीवाल यांनी पुढील २ दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील आप आदमी पार्टीच्या (आप) मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी, जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय द्याल तेव्हा मी त्या खुर्चीवर जाऊन बसेन. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आता हे का बोलत आहे, त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे की केजरीवाल चोर आहेत, भ्रष्ट आहेत, मी या कामासाठी आलो नाही. आज मी तुरुंगातून परतलो आहे, मला अग्निपरीक्षा पार करावी लागणार आहे. जोपर्यंत तुमचा निर्णय येत नाही, तोपर्यंत मी जबाबदारी स्वीकारणार नाही आणि जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत माझ्या जागी आम आदमी पक्षाचा कोणीतरी मुख्यमंत्री होईल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.