ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - रोहितला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, या देशात अन्याय सहन केला जाणार नाही. केंद्र सरकार दलित विरोधी आहे. या सरकारवर सर्वच नाराज आहेत अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी जंतर मंतर येथे देशभरातील विविध विद्यार्थी संघटनांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात पाठींबा देण्यासाठी केजरीवाल सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मोदी सरकारवर उद्योगपती, दलित, मुस्लीम सर्वच नाराज आहेत. रोहितच्या संघर्षाला मागे पडू देणार नाही. अनेक भागात दलितांवर अत्याचार झाला आहे. रोहितच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्यांना अटक करा. मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे रोहितला न्याय मिळाला नाही. प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असेही ते म्हणाले. या मोर्चात एनएसयूआय, डावे पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या आहेत.
दरम्यान, रोहित वेमुला प्रकरणावरून अरविंद केजरीवालांविरोधात जंतर मंतरवर जमलेल्या अंदोलनकर्त्या विद्यार्थांनी घोषणाबाजी केली.