काँग्रेससोबत युतीसाठी अरविंद केजरीवाल यांचा स्पष्ट नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 10:53 AM2019-03-20T10:53:00+5:302019-03-20T10:54:23+5:30
'आप'कडून पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत युती करण्यासाठीचे नव्याने प्रयत्न सुरू केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेससोबत लोकसभा निवडणुकीत युती करण्यासाठी आपण स्पष्ट नकार दिल्याचे म्हटले आहे. तसेच युती संदर्भात 'आप' आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू नसून एकत्र येण्याचे खोटे वृत्त काँग्रेसकडूनच माध्यमांमध्ये पसरवले जात असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
'आप'कडून पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत युती करण्यासाठीचे नव्याने प्रयत्न सुरू केल्यानंतर केजरीवाल यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. तत्पूर्वी दिल्लीत आप आणि काँग्रेस यांच्यातील युती निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दिल्लीत दाखल झाले होते. 'आप'चे संजय सिंह यांनी पवार यांच्याशी चर्चा देखील केली आहे. मात्र यातून अद्याप काहीही समोर आले नाही.
दिल्लीत 'आप' काँग्रेसला दोन जागा देण्यास तयार आहे. तर स्वत: पाच जागांवर लढण्यास इच्छूक आहे. तर पंजाबमध्ये स्वत: ३ आणि काँग्रेसला १० जागा देण्याची तयारी 'आप'ने दर्शविली आहे. तसेच हरियाणात काँग्रेसला चार आणि स्वत: २ जागांवर निवडणूक लढविण्यास 'आप'ची इच्चूक आहे. परंतु दिल्लीतील दोन जागांवर काँग्रेस तयार नसून काँग्रेसकडून तीन जागांची मागणी करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या प्रमुख शीला दीक्षित महायुतीच्या विरोधात आहेत. परंतु काँग्रेस नेतृत्वाचा निर्णय आपल्याला मान्य असेल असंही शीला दीक्षित यांनी सांगितले आहे.