पणजी : ‘आप’चे सर्वेसर्वा असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची येथील आझाद मैदानावर २२ मे रोजी सभा आयोजिली आहे. आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गोव्यात सध्या आम आदमी पक्ष लोकप्रिय झाला आहे. भाजप तसेच कॉँग्रेस या दोन्ही पक्षांच्या सरकारला जनता कंटाळली आहे. आम आदमी पक्षाने राज्यातील अनेक विषय हाताळल्याने सध्या लोकांचा कल आपकडे वळत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चाळीसही मतदारसंघांत उमेदवार उभे करून आम आदमी पक्ष गोव्यात आपले शक्तिप्रदर्शन करणार आहे, असे त्यांनी सांगितले. आपने सुरू केलेल्या ‘गोवा जोडो’ अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाद्वारे आपचे कार्यकर्ते लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. तसेच ठिकठिकाणी कोपरा बैठका व सभा घेतल्या जात आहेत. या महिन्यात एकूण ३०० कोपरा बैठका व सभा घेण्याचे ध्येय आहे. भाजप सरकारने लोकांना वेगवेगळी आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. विरोधी पक्षही काहीच हालचाल करताना दिसत नाही. आता ‘आप’च गोव्यात बदल घडवून आणणार आहे. यासाठी योग्य उमेदवारांची यादी तयार केली जात आहे, असे आपचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)
अरविंद केजरीवाल यांची मे मध्ये पणजीत सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2016 5:03 AM