नवी दिल्ली : आपण लवकरच तुरुंगाबाहेर येऊन दिलेली आश्वासने पूर्ण करणार, असा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठविलेला संदेश त्यांच्या पत्नी सुनीता यांनी वाचून दाखविला. केजरीवाल ज्या खुर्चीत बसून संबोधित करतात, त्याच खुर्चीत बसून त्यांच्या पत्नींनी हा संदेश वाचला. मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
‘मी आजवर भरपूर संघर्ष केला आणि भविष्यातही मोठा संघर्ष करावा लागणार आहे. कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत असून, तीच माझी ताकद आहे, असे संदेशात त्यांनी म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अटकेच्या कारवाईविरोधात केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणीस नकार दिला.
आता मुख्यमंत्री कोण? केजरीवाल तुरुंगात राहून सरकार चालवतील, असे ‘आप’च्या मंत्र्यांनी म्हटले पण त्यासाठी तुरुंग अधीक्षकांची परवानगी घ्यावी लागेल. मंंत्रिमंडळाची बैठक कशी घेणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. पत्नी सुनीता यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतून संदेश वाचला, ते पाहता मुख्यमंत्रिपदाच्या त्या दावेदार असतील, अशी चर्चा आहे. त्या विधानसभा सदस्य नसल्या तरी त्या ६ महिने मुख्यमंत्री राहू शकतील. दिल्ली विधानसभेचा ११ महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे.