नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. केजरीवाल यांच्यासोबत दिल्ली सरकारच्या ६ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल मंत्रिमंडळाला शपथ दिली. या सोहळ्यासाठी संपूर्ण दिल्लीला आमंत्रण देण्यात आलंय. यामध्ये डॉक्टर, शिक्षक, बाईक ऍम्बुलन्स रायडर्स, सफाई कर्मचारी, कन्स्ट्रक्शन वर्कर्स, बस मार्सल, ऑटो ड्रायव्हर यांचा समावेशही होता. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. मात्र नरेंद्र मोदी केजरीवाल यांच्या शपथविधीला अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले.
अरविंद केजरीवाल यांनी शपथविधी सोहळा झाल्यानंतर मी नरेंद्र मोदी यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. परंतु ते दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे शपथविधी सोहळ्यास हजर राहू शकले नाही. मात्र या मंचावरून मी त्यांच्याकडून आशीर्वादाची याचना करतो असं केजरीवाल यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीत शपथविधी सोहळा सुरु असताना नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये होते. नरेंद्र मोदींचा वाराणसी दौरा पूर्वनियोजित असल्यामुळे ते केजरीवाल यांच्या शपथविधीला उपस्थित राहू शकले नाही असं सांगण्यात येत आहे.
केजरीवाल यांच्यासहित 6 मंत्र्यांनी शपथ घेतली असून, ज्यात मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन, राजैन्द्र पाल गौतम यांचा समावेश आहे. सिसोदिया यांच्याकडे गेल्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची जवाबदारी होती. तर 2015 मध्ये स्थापन झालेल्या केजरीवाल सरकारमध्ये सत्येंद्र जैन यांच्याकडे आरोग्य खात्याची जवाबदारी देण्यात आली होती. त्याचबरोबर गोपाल राय यांना परिवहन, कैलाश गहलोत यांना गृहमंत्री आणि इतर महत्वाचे खाते, राजैन्द्र पाल गौतम यांनी पाणीपुरवठा आणि पर्यावरण सारखे खाते तर इमरान हुसैन यांच्याकडे अन्न पुरवठा मंत्री पदाची जवाबदारी देण्यात आली होती.