दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात इडीच्या अटकेत आहेत. त्यांनी येथून जारी केलेल्या कथित 'आदेशा'वरून आता वाद निर्माण झाला आहे. हा आदेश फेक असल्याचे म्हणत, दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना आणि ईडीकडे केली आहे. भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा यानी ही तक्रार केली आहे.
सिरसा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'मी आज दिल्लीचे उपराज्यपाल आणि अंमलबजावणी संचालनालयाकडे आतिशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. ज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक बेकायदेशीर आदेश दाखवला आणि हा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी ईडी कस्टडीत राहून ऑर्डर पास केली आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक होते. हा मुख्यमंत्री कार्यालयाचा गैरवापर आहे. हे दिल्लीतील लोकांसोबत आणि मुख्यमंत्री कार्यालयासोबतचे गुन्हेगारी कारस्थान आहे.'
सिरसा म्हणाले, 'दिल्लीतील निवडून आलेल्या सरकारकडून मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग केला जात आहे. कारण ईडीच्या कस्टडीतून अरविंद केजरीवाल कुठलाही आदेश काढू शकत नाहीत. अशी कुठलीही तरतूद नाही. तरीही अरविंद केजरीवाल यांच्या नावाने जे चुकीचे काम करण्यात आले आहे, त्यासंदर्भात आपण उपराज्यपालांकडे, याची ताबडतोब चौकशी व्हावी आणि गुन्हा दाखल व्हावा, असा आग्रह केला आहे. याच बरोबर, आतिशी आणि जे लोक सीएम ऑफिस हायजॅक करण्यात सहभागी होते, त्यांच्या विरोधात गुन्हेगारी कृत्यांतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात यावी.'
तसेच, "दिल्ली सरकारच्या लेटरहेडचा चुकीचा वापर करून कथित आदेश तयार करण्यात आला आहे. त्या आदेशावर नंबर, तारीख आणि स्वाक्षरीही नाही. यामुळे सत्ता आणि पदाचा गैरवापर केला जात असल्याचे स्पष्ट होते." त्यामुळे, मुख्यमंत्री कार्यालयाचा दुरुपयोग कोण करत आहे, याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.