ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 29 - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी 12 दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहेत. अरविंद केजरीवाल 30 जुलैपासून नागपुरच्या विपश्यन केंद्रात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारसोबत सुरु असलेल्या वादामुळेच अरविंद केजरीवाल यांनी विपश्यनेसाठी जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
विपश्यन केंद्रात दाखल झाल्यानंतर केजरीवाल यांना वृत्तपत्र, टीव्ही तसंच कोणत्याही माध्यमापासून दूर ठेवलं जाईल. अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत मनिष सिसोदिया दिल्ली सरकारचा कारभार हाती घेणार आहेत.
2 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर केजरीवाल पुन्हा विपश्यनेसाठी चालले आहेत. लोकसभा निवडणुकीतील प्रचारानंतर अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी गेले होते. दिल्लीमध्ये सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारसोबत अरविंद केजरीवाल यांचे वाद होत आहेत. काही दिवसांपुर्वी तर केजरीवाल यांनी' मोदी मला इतके वैतागलेत की माझी हत्या करतील', असा व्हिडिओही जारी केला होता.
राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर आपलं आयुष्य विपश्यनेसाठी वाहून देणार आहोत असं अरविंद केजरीवाल यांनी अगोदरच सांगितलेलं आहे. सरकारी शाळेत अतिरिक्त काम करावं लागणा-या शिक्षकांना विपश्यनेसाठी पाठवण्याच्या केजरीवालांच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली होती. यापेक्षा शाळेच्या इमारती, वर्गाच्या देखभालीवर आणि वीज, पाणीपुरवठ्यावर लक्ष द्यावं असं शिक्षकांनी सांगितलं होतं.