नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले. या ट्विटमुळे अनेकांना प्रश्न पडला. ट्विटमध्ये केजरीवाल म्हणाले होते की, माझा मुलगा आणि 'त्यांचा' मुलगा दोघे सोबतच आयआयटीमध्ये शिक्षण घेणार आहेत.
केजरीवाल यांनी ट्विटमध्ये टेलरच्या मुलाची माहिती दिली. या मुलाचे आयआयटीमध्ये शिकण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मुलाचे वडील टेलर असून आई घरकाम करते. केजरीवाल म्हणाले की, मला याचा आनंद आहे की, माझा मुलगा आणि त्यांचा मुलगा एकत्र आयआयटीमध्ये शिक्षण घेणार आहेत. कित्येक वर्षांपासून गरिब कुटुंबातील मुलं योग्य शिक्षण मिळत नसल्याने गरीबच राहतात. परंतु, सर्वांना चांगले शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी आम्ही कमी केली आहे.
केजरीवाल यांनी सांगितले की, विद्यार्थी विजय कुमार याचे वडील टेलर असून आई घरकाम करतात. विजयला दिल्ली सरकारने मोफत शिकवणी दिली याचा आपल्याला विशेष आनंद आहे. त्याचा आयआयटीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हेच स्वप्न होते. ते स्वप्न दिल्लीत पूर्ण होत असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांचे चिरंजीव पुलकीत केजरीवाल देखील आपल्या वडिलांप्रमाणे आयआयटीमधून शिक्षण घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांचं देखील आयटीटीमधून शिक्षण झालेलं आहे. पुलकीत केजरीवालने आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी परीक्षा दिली होती. त्यात त्याला ९६.४ टक्के गुण मिळाले होते. याची माहिती अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनीच दिली होती.