दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणाचा तपास आता थेट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दारापर्यंत जाऊन पोहोचला आहे. कारण, याप्रकरणी आता सीबीआय आम आदमी पार्टीचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करणार आहे. यासंदर्भात सीबीआयने केजरीवाल यांना 16 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावले आहे.
यानंतर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सीबीआयच्या चौकशीसाठी हजर राहतील, असे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकार दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आपने केला आहे.
सीबीआयने 16 एप्रिलला चौकशीसाठी बोलावले -सीबीआयने केजरीवाल यांना समन्स पाठवून 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दारू घोटाळ्यात काही पुरावे गोळा केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांना ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पोहोचावे लागेल. यापूर्वी, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनाही कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सिसोदिया सध्या तिहार तुरुंगात आहेत. आता सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
काय आहे केजरीवालांवर आरोप?माध्यमांतील वृत्तांनुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर दारू घोटाळ्यातील आरोपींशी बोलल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांनी दारू व्यापाऱ्यांना दिल्लीत येऊन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. याच बरोबर, केजरीवाल यांच्यासंदर्भात बरेच पुरावे गोळा करण्यात आले असून सीबीआय 16 एप्रिलला त्यांची चौकशी करेल, असे सीबीआयने म्हटले आहे.