Delhi Excise Policy Case: दिल्ली मद्य धोरणातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज (21 मार्च) अचानक ED चे पथक सीएम केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले. या प्रकरणात आतापर्यंत केजरीवालांना ईडीने चौकशीसाठी नऊ समन्स पाठवले, मात्र ते एकदाही हजर झाले नाहीत. यानंतर त्यांनी अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
यानंतर आज थेट ईडीची टीमट केजरीवालांच्या घरी पोहोचली. या टीममध्ये 6-8 एसीपी दर्जाचे अधिकारी आहेत. याशिवाय, त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे पथक केजरीवालांना दहावे समन्स बजावण्यासाठी आले आहे. यादरम्यान, अधिकारी केजरीवालांची चौकशी करत असून, त्यांच्या घराची झाडाझडती घेतली जात आहे.
उत्तर जिल्ह्याचे डीसीपी मनोज कुमार मीना यांच्यासह अनेक एसीपी दर्जाचे अधिकारी केजरीवालांच्या घरी पोहोचले आहेत. याशिवाय, केजरीवालांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशातच, मुख्यमंत्र्यांना अटक होण्याच्या भीतीने आम आदमी पार्टीची कायदेशीर टीम सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. याप्रकरणी तात्काळ सुनावणी करण्याची मागणी आपकडून होत आहे. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही मुख्यमंत्र्यांच्या अटकेची भीती व्यक्त केली.
गुरुवारी कोर्टात काय झाले?ईडीच्या समन्सप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्याविरोधात ईडीकडे पुरावे मागितले. यानंतर ईडीचे अधिकारी पुरावे घेऊन न्यायाधीशांसमोर हजर झाले. पुरावे पाहिल्यानंतर न्यायाधीश आजच या प्रकरणात मोठा निर्णय घेऊ शकतात, असे मानले जात होते. पण, न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावली 22 एप्रिल रोजी ठेवली. तसेच, केजरीवालांना अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला.