नवी दिल्ली : चंद्रावर पाणी असल्याचा उल्लेख वेदांच्या काही श्लोकांमध्ये आढळतो आणि आर्यभट्टसारख्या भारतीय खगोल अभ्यासकांना इसॅक न्यूटनच्याही आधी गुरुत्वाकर्षणाची माहिती होती, असे प्रतिपादन देशातील एक अग्रगण्य वैज्ञानिक आणि भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) माजी अध्यक्ष प्रा. जी. माधवन नायर यांनी शनिवारी येथे केले.वेदांविषयीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना ७१ वर्षांचे पद्मविभूषण नायर असेही म्हणाले की, धातूनिर्मितीशास्त्र,बीजगणित, खगोलशास्त्र, गणित, वास्तुशास्त्र आणि ज्योतिष अशा विषयांची पाश्चात्य जगाला ओळख होण्यापूर्वी कित्येक शतके आधी या विषयांचे विवेचन वेदांमध्ये आणि प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये केल्याचे आढळते.परंतु वेदांमधील हे वैज्ञानिक ज्ञान सूत्रबद्ध रूपात लिहिलेले होते त्यामुळे आधुनिक विज्ञानास त्याचा स्वीकार करणे जड गेले, असे सांगून नायर म्हणाले की, एका वेदामधील काही श्लोकांत चंद्रावर पाणी असल्याचा उल्लेख आहे, पण त्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. नायर म्हणाले की, ‘इस्रो’च्या ‘चांद्रयान’ मोहिमेने चंद्रावर पाणी असल्याचे सप्रमाण सिद्ध केले व तसे करणारा भारत हा पहिला देश ठरला. वेदांमधील वैज्ञानिक ज्ञान संस्कृतमध्ये व सूत्रांच्या रूपाने लिहिलेले असल्याने त सामान्यांना समजण्यास कठीण आहे.नायर पुढे असे म्हमाले की, ‘इस्रो’ने ‘चांद्रयान’ मोहिमेसाठी आर्यभट्ट यांच्या समिकरणांचा उपयोग केला. पृथ्वी आणि अन्य ग्रहांच्या गुरुत्वीय बलाचे ज्ञान भारतीयांना आधीपासूनच होते व न्यूटनने त्याचा शोध लावण्याच्या १५०० वर्षे आधी त्याचा उल्लेख भारतीय ग्रंथांमध्ये आढळतो. सन २००३ ते २००९ अशी सलग सहा वर्षे ‘इस्रो’चे अध्यक्ष राहिलेल्या नायर यांनी असाही दावा केला की, हरप्पा संस्कृतीच्या काळात नगरे बांधण्यासाठी भूमितीय प्रमेयांचा वापर केला गेला आणि पायथागोरसचा सिद्धांत वैदिक काळापासून ज्ञात होता. प्लास्टिक सर्जरी आणि वामानशास्त्रासह अनेक प्रकारच्या वैज्ञानिक झानाचा प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये खजिना आहे, असे भाजपा आणि संघ परिवारातील अनेक नेते सांगत असता. प्रा. नायर यांची ही प्रतिपादनेही त्याच जातकुळीची आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)४पाचव्या शतकात होऊन गेलेल्या आर्यभट्ट या भारतीय खगोलतज्ञ व गणितीचा गौरव करताना प्रा. नायर म्हणाले की, आर्यभट्ट आणि भास्कर यांनी खगोलीय रचना आणि बाह्य ग्रहांचा शोध घेण्याच्या दृष्टीने सखोल अभ्यास केला ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आजही हे काम आव्हानात्मक मानले जाते.
आर्यभट्टांना न्यूटनच्याही आधी गुरुत्वाकर्षणाची माहिती होती
By admin | Published: February 22, 2015 12:08 AM