गाझियाबाद - बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या क्रूझ पार्टी ड्रग्स प्रकरणात तुरुंगात आहे. आर्यनसंदर्भात अनेक लोक शाहरुखला साथ देताना दिसत आहेत, तर अनेक जण त्याच्यावर टीकाही करत आहेत. यातच आता, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही आर्यन खानचे नाव न घेता वक्तव्य केले आहे आणि ते सध्या चर्चेत आहे.
आर्यन खानचे नाव न घेता असदुद्दीन ओवेसी म्हणाले, मला एका फिल्मस्टारच्या मुलासाठी बोलायला सांगितले जात आहे. पण मी जे गरीब आहेत त्यांच्यासाठी बोलेन. उत्तर प्रदेशातील तुरुंगात 27% मुस्लीम कैद आहेत, त्यांच्याबद्दल कोण बोलणार? ओवेसी गाझियाबाद येथे एका सभेला संबोधित करत होते. याच वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
यावेळी त्यांनी लखीमपूर प्रकरणावरूनही सरकारवर निशाणा साधला. ओवेसी म्हणाले, आशीष शक्तीशाली उच्च वर्गातील आहे. त्यामुळेच त्याच्या वडिलांना पदावरून हटवण्याची पंतप्रधानांची हिंमत नाही. पण आशीषचे नाव आतीक असते, तर आतापर्यंत त्याला ठोकून दिले गेले असते अथवा त्याच्या घरावर बलडोजर चालला असता. याच वेळी, असदुद्दीन ओवेसी यांनी लखीमपूर प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'अब्बाजान' वक्तव्यावरूनही पलटवार केला आणि मोदी-योगी आशीषच्या 'अब्बां'ना का वाचवत आहेत? असा सवाल ओवेसींनी केला आहे.
"एक दिवस तुम्हाला माझ्यावर गर्व वाटेल" -एका वृत्तानुसार, आर्यन खान जेव्हा एनसीबीच्या ताब्यात होता, तेव्हा त्याचे काऊन्सेलिंग करण्यात आले. हे प्रत्येक ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबत केले जाते. तेव्हा एनसीबीचे समीर वानखेडे यांना आर्यन म्हणाला, ''यापुढे मी चांगले काम करेन आणि एक दिवस तुम्हाला माझ्यावर गर्व वाटेल'', असे सांगितले जात आहे.
आर्यन खान म्हणाला की, तुरुंगातून बाहेर आल्यावर मी एक चांगला व्यक्ती बनेन. तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत, गरीब लोकांना मदत करेन. तुम्हाला एक दिवस माझा गर्व वाटेल. आर्यन खानची वानखेडेंसोबत एका एनजीओच्या सदस्यानेही काऊंसिलिंग केल्याचे बोलले जात आहे.