मुंबई - अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणात मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. मलिक(Nawab Malik) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर, समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावाच मलिक यांनी केला. तसेच, समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे कागदपत्रही त्यांनी सोशल मीडियात शेअर केले होते. त्यावरुन, मलिक विरुद्ध वानखेडे संघर्ष सुरू आहे. त्यात, आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी उडी घेत समीर यांच्या पाठिशी असल्याचं म्हटलंय.
समीर वानखेडे दलित कुटुंबातील आहेत, त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातयं. मात्र, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या पाठिशी आहे, असे म्हणत समीर वानखेडे चांगलं काम करत आहेत, म्हणूनच ड्रग्जप्रकरणातील आरोपींना त्यांनी पकडल्याचं केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. तसेच, समीर वानखेडे हे दलित समाजाचे आहेत, त्यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. पण, नवाब मलिक म्हणतात, त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद आहे. दाऊद तर तिकडं पाकिस्तानात आहे, मग इथं कसा येऊ शकतो, असा प्रतिप्रश्न केला. नवाब मलिक समीर वानखेडेंच्या पाठीमागे लागले आहेत, आता आम्ही मलिकांच्या मागे लागू असे म्हणत समीर यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेवच असल्याचेही आठवलेंनी सांगितले.
काय म्हणाल्या क्रांती रेडकर
मलिकांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांचं कुटुंब चांगलेच भडकले आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर(Kranti Redkar) यांनी जात प्रमाणपत्रावरुनही स्पष्टीकरण दिलंय. जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हिंदू आहेत ते नाकारलं जाऊ शकत नाही. नवाब मलिक यांनी कोर्टात जावं. मंत्री नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत आहेत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. आरोप करताना लाज वाटली पाहिजे. हिंदू महार असल्याचं प्रमाणपत्र सासऱ्यांनी सगळ्यांना दाखवलं आहे. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते कोर्टात सिद्ध करावे. जितक्या खालच्या दर्जाला जात आहे, त्याने असंच वाटतं मंत्रिपदाचं त्यांना काही देणंघेणं नाही, असेही तिने म्हटलं आहे.
तर गुन्हा दाखल करणार
नवाब मलिक हे घाणेरडं राजकारण करत आहेत, ते आमच्या वैयक्तिक बाबी, फोटो, कागदपत्रे सोशल मीडियावरुन जाहीर करत आहेत. आता, आमच्या संयमाचा बांध फुटत आहे, त्यामुळे आता आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशाराच क्रांती रेडकर यांनी दिलाय. तसेच, नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या बर्थ सर्टीफिकेटवरुन चॅलेंज दिले होते. जर, मी शेअर केलेला जन्मदाखला खोटा असेल, तर मी राजकारण सोडून देईन असे मलिक यांनी म्हटले होते. त्यावरही, रेडकर यांनी उत्तर दिलंय, आता त्यांना ते सोडावं लागेल, असं रेडकर यांनी म्हटलंय.