नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असून त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर, भाजप नेते समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत. आता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही वानखेडेंचे समर्थन केलं आहे.
मी वानखेडे यांना कधीच भेटले नाही, पण त्यांच्याबद्दल बऱ्याच सरकारी अधिकारी आणि पत्रकारांकडून ऐकलं आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या माणसांनी त्यांच्याविरोधात जे बदनामीसत्र चालवलंय ते एकदम चीड आणणारं आहे, असे दामानिया म्हणाल्या. तसेच, वानखेडे यांचं काम सरळ आणि स्पष्ट असल्यांच ऐकलंय. मलिक यांच्याकडून वानखेडे यांची प्रतिमा आणि विश्वासर्हता कमी करण्याचा खटाटोप सुरुय. त्यामुळे, समीर वानखेडे यांच्या बाजूनं सर्व सहकारी आणि अधिकाऱ्यांनी उभं राहायला हवं. आज जर त्यांच्यासोबत कुणी उभं राहिलं नाही तर तुम्हीदेखील तुमचं कर्तव्य व्यवस्थित पाडू शकणार नाहीत,” असे स्पष्ट मत दमानिया यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, आजही मलिकांनी समीर वानखेडे भाजपचे पोपट असून, भाजपचा जीव त्या पोपटात अडकलाय, असा टोला लगावला. मलिकांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Dvendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी आज मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? असा चिमटा काढला. तसेच, कोण कोणाचा पोपट आहे, हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल, आमच्यासाठी नाही, असंही फडणवीस म्हणाले.