Aryan Khan: आर्यन खान जेलमध्ये असताना राहुल गांधींनी लिहिलं शाहरुख खानला पत्र; सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 16:11 IST2021-11-03T16:10:31+5:302021-11-03T16:11:23+5:30

NCB ने केलेल्या या ड्रग्स कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करत होते.

Aryan Khan: Rahul Gandhi wrote a letter to Shah Rukh Khan while Aryan Khan was in jail | Aryan Khan: आर्यन खान जेलमध्ये असताना राहुल गांधींनी लिहिलं शाहरुख खानला पत्र; सूत्रांची माहिती

Aryan Khan: आर्यन खान जेलमध्ये असताना राहुल गांधींनी लिहिलं शाहरुख खानला पत्र; सूत्रांची माहिती

नवी दिल्ली – मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीवर NCB नं छापेमारी करत बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला(Aryan Khan) ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आर्यनला अटक करण्यात आली. शाहरुखच्या मुलाला अटक केल्याची बातमी देशभरात गाजली. ३ ऑक्टोबरपासून आर्यन NCB च्या कोठडीत होता. न्यायालयाकडून २ वेळा आर्यनचा जामीन नाकारला गेला. त्यानंतर अखेर दिवाळीच्या आधी आर्यनला जामीन मंजूर करण्यात आला.

NCB ने केलेल्या या ड्रग्स कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करत होते. तर दुसरीकडे आता ही माहिती समोर येतेय की, आर्यन खान प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अभिनेता शाहरुख खानला(Shahrukh Khan) पत्र पाठवलं होतं. शाहरुखला धीर देत संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. आर्यन खान तुरुंगात असताना हे पत्र राहुल गांधींनी लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मागील गुरुवारी मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला जामीन मंजूर केला. २ ऑक्टोबरला NCB ने क्रेझवर छापेमारी केली तेव्हा आर्यन खान, अरबाज, मुनमुन यांना पकडलं होतं. सेशन कोर्टाने दोनदा आर्यन खानचा जामीन फेटाळला. तिसऱ्यांदा आर्यनच्या वकिलांनी केलेल्या प्रयत्नानंतर त्याला जामीन मिळण्यात यश आलं. ड्रग्स प्रकरणात आर्यनला अटक केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी आर्यनच्या समर्थनार्थ उभे राहिले.

मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरु केली. वसुलीच्या पैशातून समीर वानखेडे महागडे कपडे, वस्तू खरेदी करत आहेत. बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे एका मागासवर्गीय व्यक्तीची नोकरी हिसकावल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला. त्याचसोबत बॉलिवूडमध्ये दहशत पसरवण्यासाठी NCB कडून अशाप्रकारे बोगस कारवाई करण्यात येतात. अनेक निष्पापांना या कारवाईचा फटका बसल्याचं मलिकांनी आरोप केला.

जामीन मिळाला पण निर्बंधात अडकला

आर्यन खान याला जामीन मिळाला असला तरी कोर्टाने त्यासाठी अटी ठेवल्या आहेत. तपास अधिकाऱ्यांना न सांगता आर्यनला मुंबई बाहेर जाता येणार नाही. प्रत्येक शुक्रवारी NCB च्या कार्यालयात सकाळी ११ ते २ पर्यंत हजेरी लावावी लागेल. कुठल्याही दुसऱ्या आरोपींशी संपर्क ठेऊ नये. तपासाशी निगडीत गोष्टी सोशल मीडियात शेअर करू नये. आर्यनला पासपोर्ट NDPS कोर्टात जमा करावा लागला. कुठल्याही परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये अशा अटी जामिनावेळी ठेवण्यात आल्या आहेत.

Web Title: Aryan Khan: Rahul Gandhi wrote a letter to Shah Rukh Khan while Aryan Khan was in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.