"गेल्या ८ वर्षात जेवढे रस्ते निर्माण झाले, तेवढे मागील ६५ वर्षात बनले नाहीत"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 20:46 IST2022-11-08T20:45:27+5:302022-11-08T20:46:01+5:30
गडकरी यांनी रस्ते विकास आणि वाहनांचे यांत्रिकीकरण यासंदर्भात भाष्य केलं. लोकांना वाटतं की, मी सर्वात चांगलं काम रस्ते, बोगदे आणि पूल बनवून केलं आहे

"गेल्या ८ वर्षात जेवढे रस्ते निर्माण झाले, तेवढे मागील ६५ वर्षात बनले नाहीत"
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सोमवारी लोकांची मने जिंकली. खराब रस्त्यावरून गडकरींनी लोकांची माफी मागितली आहे. मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असताना गडकरींनी मंडलाच्या खराब रस्त्यावरून लोकांना उद्देशून भाषण करताना, तुम्हाला त्रास झाला, मी माफी मागतो, असे म्हटले. गडकरींच्या स्पष्टवक्तेपणावर नेहमीच चर्चा होत असते. अनेकदा ते आपल्याच पक्षातील काही चुकांवरही जाहीरपणे बोट ठेवताना दिसून आले आहेत. त्यामुळे, त्यांच्या भाषणाचं आणि कामाचं नेहमीच कौतुकही होतं. आता, गडकरींनी एक दावा केला आहे. त्यानुसार, गेल्या ८ वर्षात सर्वाधिक रस्ते देशात बनल्याचं त्यांनी म्हटलंय.
गडकरी यांनी रस्ते विकास आणि वाहनांचे यांत्रिकीकरण यासंदर्भात भाष्य केलं. लोकांना वाटतं की, मी सर्वात चांगलं काम रस्ते, बोगदे आणि पूल बनवून केलं आहे, पण, या देशात १ कोटीपेक्षा जास्त लोक सायकल रिक्षाने लोकांची वाहतूक करत होते, जी अमानवीय होतं. मात्र, आम्ही यांत्रिकीकरणातून ई-रिक्षा आणून हे काम बंद केलं, असे गडकरी यांनी म्हटले, तसेच, गुजरात विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने केलेल्या घोषणांवरही त्यांनी टीका केली. ज्यांना आपण सत्तेत येणार नाहीत हे माहितीय, ते सध्या काहीही वचनं देत आहेत. घोषणा करण्यात, वचनं देण्यात काही फरक पडत नाही. पण, भाजप जे बोलते ते करुन दाखवते, असेही गडकरींनी म्हटले.
पिछले 8 सालो में जितना सड़क निर्माण में काम हुआ, मैं दावे के साथ कह सकता हूं पिछले 65-66 साल में नहीं हुआ होगा। मुझे लगता है कि 2024 के अंत होने से पहले भारत का सड़क इंफ्रास्ट्रक्चर अमेरिका के बराबर होगा: केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी pic.twitter.com/ISifMoZODP
— ANI_HindiNews (@AHindinews) November 8, 2022
काँग्रेसवर निशाणा साधताना, गेल्या ८ वर्षात जेवढे रस्ते निर्माण झाले, तेवढे रस्ते मागील ६५ ते ६६ वर्षांतही देशात बनले नाहीत. मला वाटते की २०२४ पर्यंत देशातील रस्ते वाहतूक सुविधा अमेरिकोबरोबरची असेल, असा दावाही गडकरींनी केला आहे.
गडकरींनी लोकांची मागितली माफी
मध्य प्रदेशच्या मंडलातील रस्त्यांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला गडकरी आले होते. यावेळी त्यांच्याकडे जबलपुर-मंडला या ४०० कोटींच्या रस्त्याचे खराब काम झाल्याची तक्रार लोकांनी केली. यावर गडकरींनी जर चूक झाली असेल तर माफीही मागायला हवी. ४०० कोटींचा खर्च करून ६३ किमी लांबीच्या दोन लेनचा रस्ता बनविणे सुरु आहे. मी रस्त्याच्या कामावर खूश नाहीय, असे गडकरी म्हणाले. यानंतर लगेचच गडकरींनी या हायवेचे उर्वरीत काम तात्काळ रोखावे, जुने जे काम झालेय त्याची तातडीने दुरुस्ती करावी, नवीन टेंडर काढून चांगला रस्ता करावा, असे आदेश दिले. याचबरोबर आलेल्या लोकांना त्यांनी तुम्हाला जो त्रास झालाय, त्यासाठी मी माफी मागतो, असे म्हणाले.