आमदारकीचा राजीनामा देताच भाजपात प्रवेश, काँग्रेस आमदार चांगलेच चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 02:14 PM2022-05-03T14:14:45+5:302022-05-03T14:20:36+5:30

कोतवाल यांनी विधानसभा अध्यक्ष नीमाबेन आचार्य यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. कोतवाल यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ 1 ने घटलं आहे

As soon as he resigned as MLA Ashwin Kotwal, he joined BJP, Congress MLA is well discussed | आमदारकीचा राजीनामा देताच भाजपात प्रवेश, काँग्रेस आमदार चांगलेच चर्चेत

आमदारकीचा राजीनामा देताच भाजपात प्रवेश, काँग्रेस आमदार चांगलेच चर्चेत

googlenewsNext

अहमदाबाद - गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी जलद होत आहेत. त्यातच, राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या गुजरातमधीलकाँग्रेसला मोठा धक्का देण्यात आला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार अश्विन कोतवाल यांनी मंगळवारी गुजरातच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गुजरातमध्ये यंदाच्या वर्षीच डिसेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.

पाच राज्यांतील दारुण पराभवानंतरही काँग्रेसला एकावर एक धक्के बसत आहेत. हार्दिक पटेल यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलेला असतानाच काँग्रेसच्या अश्विन कोतवाल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, भाजपमधील प्रवेश निश्चित झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदिवासी समाजाचा विकास करण्यास केवळ भाजप सक्षम असल्याचे या नेत्याने म्हटले आहे. कोतवाल यांनी विधानसभा अध्यक्ष नीमाबेन आचार्य यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. कोतवाल यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचं विधानसभेतील संख्याबळ 1 ने घटलं आहे. विधानसभेत काँग्रेसचे 63 आमदार उरले आहेत. तर भाजपचे संख्याबळ 111 असे आहे. काँग्रेस नेते सुखराम राठवा यांना विपक्ष नेता बनविल्याने कोतवाल नाराज होते. 

काँग्रेसमधील एक मोठे नाव आणि दमदार नेते म्हणून ओळख असलेल्या अश्विन कोतवाल यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. आदिवासी समाजावर अश्विन कोतवाल यांची मजबूत पकड असल्याचे बोलले जाते. खेडब्रह्मा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. अश्विन कोतवाल यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते पद न मिळाल्यामुळे अश्विन कोतवाल काँग्रेसवर नाराज होते

राजीनाम्यानंतर काय म्हणाले कोतवाल

सन २००७ पासून काँग्रेस आमदार म्हणून काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हापासून त्यांचे काम, त्यांची कार्यशैली मी जवळून पाहिली आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असल्यापासूनच माझ्यावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. मात्र, केवळ विचारधारेमुळे मी काँग्रेसमध्ये आजपर्यंत राहिलो. मला माझ्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समूहाचा विकास करायचा आहे. त्यांच्यासाठी चांगले काम करायचे आहे. आदिवासी समाजाचा विकास करण्यास केवळ भाजपच सक्षम आहे आणि म्हणूनच काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे अश्विन कोतवाल यांनी सांगितले.

Web Title: As soon as he resigned as MLA Ashwin Kotwal, he joined BJP, Congress MLA is well discussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.