लखनौ - सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी योगीभक्ताचा एक व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. राजकीय नेत्यांना पाठिंबा देणारे आतापर्यंत वेगवेगळे कार्यकर्ते आपण पाहिले असतील. नेत्याचा आदेश म्हटलं की मागचा-पुढचा विचार न करता काम चोख बजावणारे, गल्लोगल्ली घोषणा देत फिरणारे हे कार्यकर्ते. पण, अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समर्थक अशी ओळख असलेल्या प्रभाकर मौर्य याने चक्क योगी आदित्यनाथ यांचं मंदिर उभारलं होतं. मात्र, आते हे मंदिर काढून टाकण्यात आलं आहे. कल्याण भदरसामधील मंदिरातून योगींची मूर्ती हटविण्यात आली आहे.
येथील मंदिरात प्रभाकर हे सकाळ-संध्याकाळ मंदिरात आदित्यनाथ यांच्या मूर्तीची आरती करत. एवढंच नाही तर प्रभाकर मौर्य यांनी मुख्यमंत्री योगींच्या समर्थनार्थ शेकडो गाणी देखील गायली आहेत. मात्र, आता या मंदिरातील योगींची मूर्ती काढून टाकण्यात आली आहे. मंदिराचे संस्थापक प्रभाकर मौर्य यांच्या काकांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. ज्या खडकाळ जमीनीवर योगी आदित्यनाथ यांचं मंदिर उभारण्यात आल होतं. त्यावर त्यांच्या वारसांचा ताबा आहे, शिवाय प्रभाकर यांनी मूर्ती बसवलेल्या जागेवरही त्यांचाच ताबा आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे.
रविवारी २५ सप्टेंबर रोजी पीएसीसह मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तात येथील मूर्ती हटविण्यात आली आहे. पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी कॅमेऱ्यासमोर यासंदर्भात माहिती देत नाहीत. तसेच, येथील जमीन सरकारी आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, मूर्तीबाबत आम्हाला माहिती नाही, असे ते म्हणतात. तर, माझ्या तक्रारीनंतरच ही कारवाई झाल्याचे प्रभाकर यांच्या काकांनी म्हटलं आहे. याबाबत आज तकने वृत्त दिले आहे.
युट्यूबच्या पैशातून मूर्तीवर खर्च
दरम्यान, यूट्यूबवर प्रभाकर मौर्य यांचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि योगींच्या मंदिराच्या बांधकामात जो काही खर्च झाला आहे, तो यूट्यूबवरून कमावलेल्या पैशातून केल्याचे प्रभाकर मौर्य सांगतात. प्रभाकर मौर्य यानं ५ ऑगस्ट २०२० रोजी योगींच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केला होता. त्याच दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाच्या राम मंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजनाचं काम केलं होतं.