इस्रोचे चंद्रयान मिशन-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अपले काम करत आहे. चंद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आपले संशोधन करत आहे. यातच इस्रोने (ISRO) प्रज्ञान रोव्हरचा एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर गोल-गोल फिरताना दिसत आहे. तत्पूर्वी, चंद्रयान-3 मिशनच्या तीन उद्दीष्टांपैकी दोन उद्देश पूर्ण झाल्याचे इस्रोने म्हटले होते. ते म्हणजे, चंद्राच्या पृष्ठ भागावर सुरक्षित सॉफ्ट लँडिंग आणि चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरची भटकंती. तर, चंद्राच्या पृष्ठ भागावर वैज्ञानिक प्रयोगांशी संबंधित तिसरे लक्ष्य पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
विक्रमला विचारून ठेवतोय पाऊल -विक्रम लँडरच्या चंद्रावरील लँडिंगनंतर, आता आपले रोव्हर प्रज्ञान भटकंती करत आहे. विक्रम आपल्या कॅमेऱ्याने रोव्हरचे फोटोही पाठवत आहे. प्रज्ञानच्या मूनवॉक करतानाचे फोटोही इस्रोने शेअर केले आहेत. आता, लँडर आणि रोव्हर यांच्यातील संवादासंदर्भात माहिती मिळाली आहे. हो, हे खरे आहे. लँडरमधून सुरक्षितपणे चंद्रावर उतरलेल्या प्रज्ञानने एखाद्या मुलाप्रमाणे, विक्रमला विचारले, 'मी मूनवॉकसाठी जाऊ शकतो?' इस्रोनेही हा संवाद देशवासियांसोबत शेअर केला आहे.
खड्ड्यांपासून असा करतोय स्वतःचा बचाव - प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर हे प्रत्येक गोष्ट आपसात बोलून करत आहेत. हे ऐकायला आपल्याला नक्कीच थोडे विचित्र वाटेल, पण आपल्या वैज्ञानिकांनी यांची निर्मिती अशाच पद्धतीची केली आहे. चांद्रावरील मोठ मोठ्या खड्ड्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रोव्हर सेंसर्सची मदत घेतो आणि असे काही आढळल्यास आपला मार्ग बदलतो.
यापूर्वी फोटो शेअर करत इस्रोने माहिती दिली होती की, "27 ऑगस्ट रोजी चंद्रयान-3 मोहिमेतील प्रज्ञान रोव्हर त्याच्या स्थानापासून 3 मीटर अंतरावर असलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ पोहोचले होते. पण, नंतर रोव्हरने सुरक्षितपणे नवीन मार्ग निवडला."