पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल हाती आले आहेत. बहुतांश राज्यांत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता जाण्याचा अंदाज आहे, तर मध्य प्रदेशमध्ये भाजप सत्तेत राहण्याचा अंदाज आहे. तेलंगणामध्ये केसीआर यांना धक्का बसण्याचा अंदाज आहे, तर छत्तीसगडमध्ये भाजपा सत्ताधारी काँग्रेसला टक्कर देण्याच्या तयारीत दिसत आहे. अशातच आजतक-अॅक्सिसच्या सर्व्हेत काँग्रेस आणि भाजपामध्ये एक टक्के मतांचे अंतर दिसल्याने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी पळापळ सुरु केली आहे.
या एक्झिट पोलनुसार काँग्रेसचा ४२, भाजपाला ४१ आणि इतरांना १७ टक्के मतदान होताना दिसत आहे. परंतू, या एक टक्के मतांच्या फरकाने काँग्रेस आणि भाजपातील जागांचे अंतर चार ते सहा जागांचेच राहिले आहे. काँग्रेसला ४०-५० जागा तर भाजपाला ३६-४६ जागा मिळताना दिसत आहेत. इतरांच्या खात्यात १ ते ५ जागा दिसत आहेत.
एकंदरीतच सत्तेसाठीचे अंतर फारच कमी असल्याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी धावपळ सुरु केली आहे. उमेदवारांना एकत्र ठेवण्यासाठी, त्यांना तातडीने त्यांच्या मतदारसंघातून आपल्याकडे आणण्यासाठी चार्टर प्लेन बुक केली आहेत. या विजयी उमेदवारांना लागलीच बंगळुरूला हलविण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी काँग्रेसने ७२ सीटचे चार्टर प्लेन बुक केले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचेच सरकार आहे, यामुळे त्यांच्यासाठी तिच सेफ जागा मानली जात आहे.
विजयाचे प्रमाणपत्र मिळताच ते घेऊन थेट रायपूरला यावे, असे आदेश पक्षाने उमेदावारांना दिले आहेत. व्हीआयपी रोडवरील एका हॉटेलमध्ये नवनिर्वाचित आमदारांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. रात्री पर्यंत हे आमदार रायपूरला येतील अशी अपेक्षा आहे, या आमदारांना ४ डिसेंबरला बेंगळुरूला हलविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.