सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 04:11 PM2024-05-30T16:11:29+5:302024-05-30T16:12:00+5:30
...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर थेट निशाणा साधला. ते पंजाबमधील होशियारपूर येथे आज लोकसभा निवडणूक 2024 च्या अखेरच्या सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी 125 दिवसांचा अजेंडाही सांगितला.
काँग्रेस भ्रष्टाचाराची जननी आहे. गेल्या 60 वर्षांत काँग्रेसने जे काही 'कारनामे' केले आहेत, ते पाहून, काँग्रेसने भ्रष्टाचारात डबल पीएचडी केल्यासारखे वाटते. आता असे वाटत आहे की, काँग्रेससोबत आणखी एक कट्टर भ्रष्टाचारी पक्ष जोडला गेला आहे. ते येथे एकमेकांच्या विरोधात लढण्याचे नाटक करत आहेत. दिल्लीत सोबत निवडणूक लढत होते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर थेट निशाणा साधला. ते पंजाबमधील होशियारपूर येथे आज लोकसभा निवडणूक 2024 च्या अखेरच्या सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी 125 दिवसांचा अजेंडाही सांगितला.
काँग्रेस-AAP आघाडीवर हल्लाबोल -
पंतप्रधान म्हणाले, ''या खोटारड्या पक्षाचे पहिले सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यानेच दिल्लीत स्थापन झाले होते, हे लोक विसरलेले नाहीत. त्यांनी भ्रष्टाचाराची जननी असलेल्या काँग्रेसकडून भ्रष्टाचाराचे धडे घेतले आहेत. भ्रष्टाचाराची जननी असलेल्या काँग्रेसच्या कुशीतून हे कट्टर भ्रष्टाचारी जन्माला आले आहेत. पंजाब नशामुक्त करू, असे हे लोक म्हणत होते. मात्र त्यांनी नशेलाच आपल्या कमाईचे साधन बनवले. दिल्लीतील दारू घोटाळा संपूर्ण जगाला माहीत झाला आहे. आज संपूर्ण जग दिल्लीपासून पंजाबपर्यंत त्यांचे कारनामे बघत आहे."
125 दिवसांचा अजेंडा -
"या निवडणुकीच्या धावपळीतही आपल्या सरकारने एक क्षणही वाया घालवला नाही. सरकार स्थापन होताच, तिसऱ्या टर्ममध्ये पुढील 125 दिवसांत काय होणार, सरकार काय करणार, कसे करणार, कुणासाठी करणार आणि कधीपर्यंत करणार याचा रोड मॅप तयार करण्यात आला आहे. यातही 25 दिवस विशेषतः तरुणांसाठी केंद्रीत करण्यात आले आहेत. पुढील 5 वर्षात कोणते मोठे निर्णय घ्यायचे याबाबतची रूपरेषाही तयार करण्यात आली आहे," असेही मोदी म्हणाले.