नवी दिल्ली : पावसाळा सुरू होताच पहिल्यांदा पालेभाज्या महाग झाल्या. त्यानंतर आता चणाडाळ, जिरे आणि हळद यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे किचनचे बजेट बिघडले आहे. मोठी विलायची आणि दालचिनी यांचे भावही वाढले असून, आगामी काही दिवसांत लाल मिरचीही महाग होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
व्यावसायिकांनी सांगितले की, भाज्या महाग झाल्या की, लोक वरण, छोले, राजमा यांना प्राधान्य देतात; पण सर्वाधिक स्वस्त असलेली चणाडाळही आता १२० रुपये किलो झाल्यामुळे गृहिणी हैराण झाल्या आहेत. गेल्याच महिन्यात चणाडाळ १०० रुपये किलो होती. व्यावसायिकांनी सांगितले की, जुलै-ऑगस्टमध्ये चणे महागतात. चण्याचे पीक मार्च-एप्रिलमध्ये काढणीला येते. नवे पीक येताच चण्याचा भाव उतरतो. मध्य प्रदेश आणि हरयाणासह अनेक राज्यांत चण्याचे उत्पादन होते.
तुरीची डाळ २०० रुपयांवर
तूर डाळीचे भाव तेजीत आहेत. तूरडाळ २०० रुपये किलो दराने विकली जात आहे. उच्च दर्जाची तूरडाळ तर २२५ रुपयांपर्यंत आहे. मात्र, चणाडाळीचे भाव सध्या ११५ ते १२० रुपये किलो झाले आहेत.
हळद दुपटीपेक्षा अधिक वाढला
मसाला व्यावसायिक रवींद्र अग्रवाल म्हणाले की, यंदा मसाल्याचे भावही वाढले आहेत. यास प्रामुख्याने उत्पादनात झालेली घट हे कारण आहे. घाऊक बाजारात हळद दुपटीपेक्षा अधिक महाग होऊन १७० रुपये किलो झाली आहे.
जिरे २० रुपयांनी महागले
मागील काही दिवसांत जिरेही महागले आहेत. जियांचा भाव २० रुपयांपर्यंत वाढून ३२० रुपये किलो झाला आहे. मोठी विलायची व दालचिनीचे भावही वाढले आहेत. सूत्रांनी सांगितले की, येणाऱ्या दिवसांत लाल मिरच्यांचे भावही वाढतील, असा अंदाज आहे.