पश्चिम बंगालमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना झाला. तसेच सात टप्प्यात चालेल्या बंगालमधील निवडणुकीत प्रत्येक टप्प्यामध्ये हिंसाचार झाला होता. दरम्यान, शनिवारी झालेल्या सातव्या टप्प्यातील मतदानानंतर पश्चिम बंगालमधील नादिया येथे एका भाजपा कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हत्या झालेल्या भाजपा कार्यकर्त्याचं नाव हफीजूल शेख असं असून, त्याने हल्लीच भाजपामध्ये प्रवेश केला होता.
शनिवारी संध्याकाळी चहाच्या दुकानावर हफीजूल शेख याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. हफीजूलच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या. मृताच्या नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार त्याने हल्लीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, मृत आणि त्याची हत्या करणारा आरोपी हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिला. या प्रकरणातील आरोपीची ओळख पटवण्यात आली असली तरी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या होत्या. याआधी सहाव्या टप्प्यातील मतदानापूर्वी काही तास आधी पूर्व मिदनापूर येथे तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. तर तृणमूल काँग्रेसचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला होता.