अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे भव्य दिव्य मंदिर उभे राहिले आहे. रामललांची प्राणप्रतिष्ठपनाही झाली आहे. मंदिर सर्वसामान्यांसाठीही खुले झाले आहे. या मंदिराचा सर्वाधिक फायदा भाजपला होईल, असे बोलले जात आहे. भाजपही राम मंदिराचा मुद्दा व्यक्ती-व्यक्तीपर्यंत घेऊन जात आहे. महत्वाचे म्हणजे, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत याचा परिणाम होताना दिसत आहे.
विरोधक शोधून काढतायत तोडगा! -यानंतर आता देशातील सर्वच पक्षांनी भाजपला टक्कर देण्यासाठी यावर तोडगा शोधणे सुरू केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्यांच्यावर देवाला मानत नसल्याचा आरोप केला जातो, असे तामिळनाडू सरकारही आता धर्म आणि इश्वरावर भाष्य करताना दिसत आहे.
डीएमके पहिल्यांदाच देवाला शरण -तामिळनाडूमध्ये 'मंदिर पॉलिटिक्स' सुरू झाले आहे. महत्वाचे म्हणजे, डीएमके हा नास्तिक विचारधारा असलेला पक्ष मानला जातो. पण, पक्षातील नेत्यांना मंदिर अथवा मशिदीत जाण्यापासून रोखले जात नाही. मात्र, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके सरकार पहिल्यांदाच भगवान मुरुगन यांना शरण जाताना दिसत आहे. हिंदुत्वाच्या रथावर स्वार भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी डीएमकेची ही खेळी असल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीनं मंदिरात केली पूजा -यातच दयनिधी स्टॅलिन यांची आई दुर्गा स्टॅलिन यांचा मंदिरातील पूजा करतानाचा फोटो व्हायरल होत आहेत. दुर्गा स्टॅलिन यांनी राज्यातील मेयिलादुथुरई जिल्ह्यातील थिरुवेंगाडू येथील श्री सुवेधरनायेश्वर स्वामी मंदिरात विधीवत पूजा केली.
मंदिरांमध्ये भक्तांना मोफत ताक मिळणार - लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर डीएमके आपली हिंदू विरोधी छबी सुधारून, हिंदू हितकारक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे, मंदिरांमध्ये भक्तांना मोफत ताक वाटप करणे. यासंदर्भात बोलताना राज्याच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडॉमेंट्स विभागाचे मंत्री पी. के. शेखर बाबू गुरुवारी सांगितले की, या दिवसांत प्रचंड उन पडते. यामुळे भाविक तहानलेले राहतात. त्यांना मंदिरांमध्ये मोफत ताक दिले जाईल.
मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची तहान भागवणे आमचे मुख्य कर्तव्य असून यासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. या योजनेचे नाव 'नीर मोर' असे आहे. आगामी काळात या योजनेचा संपूर्ण देशभरात विस्तार करण्याचा मानस आहे. एवढेच नाही, तर ही योजना शुक्रवारी राज्यातील 48 मंदिरांमध्ये सुरू केली जाईल, असेही पी. के. शेखर बाबू यांनी म्हटले आहे.