बिहारमधील दरभंगा शहरापासून सुमारे ६५ किमी अंतरावर कमला नदीवर असलेला ब्रिज मोडून पडला. सामानाने भरलेला अवजड ट्रक वरून जात असतानाच हा पूल करकर आवाज होऊन मोडून पडला. तर ट्रक ब्रिज आणि नदीच्या मध्ये अधांरती लटकून राहिला. या अपघाताची माहिती मिळताच शेकडो लोकांचा जमाव घटनास्थळी जमला.
जिल्ह्यातील कुशेश्वरस्थान पोलीस ठाण्याच्या परिसरात येणाऱ्या राज घाट मुख्य मार्गावरील सोहरवा घाटातील ही घटना आहे. दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातादरम्यान, पुलावरून जात असलेल्या दोन दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली.
हा पूल चार जिल्ह्यांना आणि सुमारे १० पंचायतींना जोडणारा एकमेव मार्ग आहे. स्थानिक रहिवासी त्रिभुवन कुमार याने सांगितले की, २०२१ मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी येथे एक नवे पुल बांधण्याची घोषणा केली होती. त्याचं भूमीपूजनही झालं होतं. तसेच येथे असलेल्या जुन्या पुलाची डागडुगी करण्यात येणार होती. मात्र या जुन्या पुलाची डागडुगी झाली नाही. तसेच नव्या पुलाच्या बांधकामालाही सुरुवात झाली नाही.
दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, हा पूल चार जिल्ह्यांना जोडतो. तसेच अनेक गावांमधील लोकांना त्याचा फायदा होत होता. आता सरकारने लवकरात लवकर या पुला पर्यायी मार्ग उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच संबंधित विभागाच्या जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.