गांधीनगर - गुजरातमध्ये आगामी स्थानिक निवडणुकांसाठी भारतीय ट्रायबल पार्टी (Bhartiya Tribal party) आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी सोबत आले आहेत. या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बीटीपी आमदार छोटूभाई वसावा (Chotubhai Vasava) यांनी शनिवारी माहिती दिली. वसावा म्हणाले, बीटीपी आणि एआयएमाआयएम संविधान वाचविण्यासाठी एकत्रितपणे राजकारणाच्या आखाड्यात उतरले आहेत. येथे फेब्रुवारी-मार्च महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत.
छोटू वसावा हे जहागडियाचे आमदार आहेत. ते म्हणाले, बीटीपी आणि AIMIM गुजरातमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार आहेत. तसेच चांगल्या भविष्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही हटविण्यासाठी जनतेला काम करावे लागेल. बीटीपीला राजस्थानमध्ये धोका मिळाला कारण तेथे बीटीपीला दूर ठेवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस एकत्र आले होते, असेही ते म्हणाले.
या शिवाय, ओवेसी यांना आपण गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी बोलावणार असल्याचेही ते म्हणाले. संपूर्ण गुजरातमध्ये बीटीपीचे केवळ दोनच आमदार आहेत. त्यापैकी एक छोटू वसावा तर दुसरा त्यांचाच मुलगा आहे. या शिवाय बीटीपीचे राजस्थानातही दोन आमदार आहेत. मात्र, अद्याप यावर ओवेसींकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी वसावा जेडीयूतही होते.
बीटीपीने राजस्थानातील राजकीय समिकरण बदलले -असदुद्दीन ओवेसी यांनी राजस्थानत बीटीपीला पाठिंबा देण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवला होता. तेव्हाच, ओवेसी राजस्थानातील राजकारणात उतरण्याच्या प्रयत्नात असल्याचा कयास लावला जात होता. ओवेसी यांनी एका ट्विटच्या माध्यमाने बीटीपीला समर्थन दर्शवले होते. बीटीपीने नुकतेच अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारचा पाठिंबा मागे घेतला आहे.