हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी 18 व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात आज खासदार म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर ओवेसी यांनी 'जय फलिस्तीन' (पॅलेस्टाईन), अशी घोषणा दिली. त्यांच्या या कृत्याने आता राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्रोटेम स्पीकरने असासुद्दीन ओवेसी यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी बोलावले. ओवेसी आले आणि त्यांनी बिस्मिल्लाह म्हणत, खासदारकीची शपथ घेतली. खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी 'जय भीम, जय तेलंगणा आणि नंतर जय फलिस्तीन (पॅलेस्टाईन)' अशी घोषणा दिली. यामुळे भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला.
पाचव्यांदा निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले आहेत ओवेसी - असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद लोकसभा सीटवरून सलग पाचव्यांदा निवडणूक जिंकली आहे. यावेळी त्यांना 6,61,981 मते मिळाली आहेत. त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा 3,38087 मतांनी पराभव केला. तत्पूर्वी, 2019 च्या निवडणुकीत ओवेसी यांना एकूण 58.95% मते घेत विजय मिळवला होता.
केव्हा केव्हा जिंकले आहेत ओवेसी - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी हैदराबाद मतदारसंघातून सर्वप्रथम 2004 मध्ये निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले होते. यानंतर त्यांनी 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग विजय मिळवला आहे.