Asaduddin Owaisi, No Confidence Motion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावर मंगळवार पासून चर्चा सुरू असून आज संध्याकाळी मोदी त्यावर उत्तर देणार आहे. या चर्चेदरम्यान आज, एमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर तोंडसुख घेतले. जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबार, मणिपूर हिंसाचार, हिजाबचा मुद्दा, UCC या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला त्यांनी घेरले. कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत, त्यांना सरकारने अजून का आणले नाही?, असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला केला. यावेळी बोलताना, भारत देश महत्त्वाचा की हिंदुत्व महत्त्वाचे, असा सवाल त्यांनी केला. याशिवाय, एक चौकीदार तर दुसरा दुकानदार असे म्हणत त्यांनी एकाच वेळी दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्याची खिल्ली उडवली.
"बिलकिस बानो या देशाची मुलगी होती की नाही? तिच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांची सुटका करण्यात आली. आज चीन सीमेवर काय सुरू आहे? तरीही शी जिनपिंगला अहमदाबादला बोलावून पाहुणचार केला जातो. कुलभूषण जाधव पाकिस्तानात आहेत, त्यांना परत का आणले जात नाही? या देशाला द्वेषाच्या राजकारणात ओढू नका, अल्पसंख्याकांचा बजेट ४० टक्क्यांनी कमी केले. फेलोशिप कमी केली. उच्च शिक्षणापासून मुस्लीम समाजातील तरूणाला वंचित ठेवले. मोदी सरकारमध्ये एकही मुस्लीम नाही हा कुठला न्याय? हरयाणा आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर ओवेसींनी टीका केली. कवितेतून टोमणा मारत ओवेसी म्हणाले की, तु्म्हाला आमच्या लोकांना न्याय देता येत नसेल, तुम्ही काही करू शकत नसाल, तर खाली का उतरत नाही? पंतप्रधान जेव्हा सभागृहात उत्तर देण्यासाठी येतील तेव्हा त्यांनी सांगावे की देश मोठा की हिंदुत्व? असा सवाल त्यांनी केला.
ट्रेनमध्ये लोकांची ओळख करून त्यांना मारले जाते. देशात राहायचे असेल तर मोदींना मत द्यावे लागेल असं धमकावतात. हे आपल्या देशात काय चाललंय? लोक कपडे, दाढी पाहून मारले जातात. नूंहमध्ये मुस्लिमांची घरे पाडली. मुस्लिमांसाठी द्वेष पसरवला जात आहे. हिजाबचा मुद्दा पुढे करून शिक्षणापासून तोडले जाते. चीन आपल्या देशात घुसून बसलाय त्यावर तुम्ही काही बोलत नाही, असा आरोप त्यांनी केला.
"तुम्ही म्हणत आहात की मणिपूरचे मुख्यमंत्री सहकार्य करत आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांना हटवायचे नाही. आसाम रायफल्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. महिलांवर अत्याचार होत आहेत. ट्रेन मध्ये नाव विचारून मारले जात आहे. देशात राहायचे असेल तर मोदींना मतदान करावे लागेल, असे सांगितले जात आहे. हे सर्व आपल्या देशात का होत आहे. हे सारं योग्य नाही", असा मुद्दाही त्यांनी संसदेत बोलताना मांडला.