नवी दिल्ली: संसदेचं कामकाज होऊ न शकल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या स्वपक्षीय खासदारांसह उपोषण करणार आहेत. या उपोषणावर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीकेची झोड उठवली आहे. 'मोदींनी त्यांच्या खोट्या आश्वासनांचं प्रायश्चित्त म्हणून उपोषण करावं,' अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. 'दलितांचं कल्याण, तरुणांना रोजगार ही मोदींची सर्व आश्वासनं खोटी ठरली. या फसव्या आश्वासनांचं प्रायश्चित्त म्हणून मोदी उपोषण करणार का?,' असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. संसदेचं कामकाज गदारोळामुळे वाया गेलं. त्यामुळे अनेक विधेयक मंजूर होऊ शकली नाहीत. यासाठी भाजपनं काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. काँग्रेस खासदारांच्या गदारोळामुळेच संसदेचं कामकाज होऊ शकलं नाही, असा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे उद्या (गुरुवारी) भाजप खासदार उपोषण करणार आहेत. याबद्दलची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. यावरुन ओवेसी यांनी मोदींवर तोंडसुख घेतलं आहे. 'मोदी त्यांच्या फसव्या आश्वासनांचं प्रायश्चित स्वीकारण्यासाठी उपोषण का करत नाहीत? आत्महत्या केलेले शेतकरी, बेरोजगार तरुण यांच्यासाठी मोदी उपोषण करणार का?,' असे प्रश्न ओवेसींनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केले. 'पंतप्रधान मोदी संसदेच्या कामकाजाचा वेळ वाया गेल्याबद्दल उपोषण करणार आहेत. मग त्यांनी शेतकरी आत्महत्या, कथुवामध्ये अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार, त्या प्रकरणातील भाजप आमदाराला मिळणारी विशेष वागणूक या प्रश्नांवरही उपोषण करावं,' असा सल्ला ओवेसींनी दिला. संसदेचं कामकाज होऊ देणं, भाजपला शक्य होतं. मात्र त्यांनी जाणूनबुजून संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही, असा आरोपही त्यांनी केला.
'फसव्या आश्वासनांचं प्रायश्चित्त म्हणून उपोषण करणार का?'; ओवेसींचा मोदींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 5:44 PM