नवी दिल्ली -अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे आणण्यासंदर्भात आणि इतरही काही मुद्द्यांसंदर्भात, कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी मंगळवारी दोहा येथे तालिबानी नेत्याची भेट घेतली. कुठल्याही तालिबानी नेत्यासोबतची भारत सरकारची ही पहिलीच औपचारिक भेट होती. या भेटीसंदर्भात विरोधी पक्षांनी केंद्रावर निशाणा साधला असताना, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही, सरकारला सवाल करत, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे म्हटले आहे.
तालिबानच्या भेटीवरून ओवेसींचा सवाल - ओवेसी म्हणाले, हा राष्ट्रीय सुरक्षिततेचा मुद्दा आहे. त्यामुळे, तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही? यासंदर्भात भारताने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. याच बरोबर ओवेसी यांनी यूपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या दौऱ्यासंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले, आपण 7 सप्टेंबरला फैजाबाद, 8 सप्टेंबरला सुलतानपूर आणि 9 सप्टेंबरला बाराबंकीला जाणार आहोत. याशिवाय, येणाऱ्या निवडणुकीत योगी सरकारला पराभूत करण्यासाठी आपण इतरही काही ठिकाणी दौरे करणार आहोत, असेही ते म्हणाले.
बगराम एअरपोर्ट मिळविण्याच्या प्रयत्नात चीन; भारताविरोधात आखतोय अशी रणनीती
ओमर अब्दुल्लांनीही विचारला होता सवाल - अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा भारतावर काय परिणाम होईल, असा प्रश्न सामान्यांना पडला असताना, यावर प्रतिक्रिया देताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, तालिबानचा जम्मू-काश्मीरवर काय परिणाम होईल, याबाबत केंद्रातील मोदी सरकारला विचारायला हवे. तसेच तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हेही मोदी सरकारने स्पष्ट करायला हवे, अशी मागणी ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.