नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election) प्रचारासाठी आलेल्या AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या वाहनावर गुरुवारी दोन जणांनी गोळीबार केला. या हल्ल्यातील दोन्ही आरोपींना यूपी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद अधिवेनात उमटल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांना केंद्र सरकारने Z श्रेणीची सुरक्षा पुरवली आहे.
हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. वृत्तसंस्था एएनआयने सांगितल्यानुसार, केंद्र सरकारने खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्यांना तातडीने सीआरपीएफची Z श्रेणीची सुरक्षा दिली आहे.
आरोपी अटकेतओवेसींवर झालेल्या हल्ल्यानंतर, शुक्रवारी एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले होते की, सविस्तर चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजवरुन या घटनेत दोन लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या दोघांनाही पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली असून, घटनेत वापरलेले हत्यार आणि एक कार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, सचिन आणि शुभम अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
नेमकं काय घडलं ?उत्तर प्रदेशमध्ये प्रचार करुन दिल्लीला परतत असताना पश्चिम उत्तर प्रदेशातील हापूरजवळील टोल प्लाझा येथे असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार झाला. यात त्यांच्या गाडीवर आणि टायरावर गोळ्या लागल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळीबारानंतर हल्लेखोर शस्त्रे सोडून पळून गेले. या हल्ल्यानंतर ओवेसींनी ट्विटरवर गाडीवर पडलेल्या बुलेट होलचा फोटो शेअर करत हल्ल्याची माहिती दिली.