हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे मोठ-मोठ्या नेत्यांच्या सभांनी हैदराबाद दणाणून चालले आहे. योगी आदित्यनाथ यांनी रविवारी ओवैसींवर निशाणा साधला होता. ओवैसींनी ही योगींवर पलटवार केला आहे. हिंदुस्थान मेरे अब्बा का है, मै नही जाऊंगा, असे म्हणत योगींवर पलटवार केला. तसेच तुम्हाला तारीख तर माहिती नाही अन् इतिहासातही झिरो आहात तुम्ही, असे ओवैसी यांनी योगी आदित्यनाथ यांना म्हटले. तत्पूर्वी ट्विट करुन 'सायं 7 ते 10 या वेळेत माझं उत्तर ऐका', असे आवाहन ओवौसींनी योगींना केला होते.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी काँग्रेस आणि भाजपावर वारंवार टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओवैसींना रविवारी थेट इशारा दिला होता. भाजपा सत्तेत आल्यास ओवैसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. योगी आदित्यनाथ यांच्या या इशाऱ्याला ओवैसी यांनी उत्तर दिलं.
ओवैसी यांनी आदित्यनाथ यांना उत्तर देताना अनेक प्रश्न केले आहेत. हा देश तुमचा आहे, माझा नाही?, भाजपा विरुद्ध बोलणे, मोदींविरुद्ध बोलणे, आरएसएसविरुद्ध बोलणे, योगींविरुद्ध बोलणे आणि त्यांच्या विचारांना विरोध केल्यामुळे देश सोडावा लागेल? असे प्रश्न ओवैसींनी योगींना विचारले आहेत. तसेच माझ्या वडिलांचा जेव्हा जन्म झालता, तेव्हा तो हिंदुस्थानमध्ये झाला होता. त्यामुळे हा देश माझ्या वडिलांचा आहे, त्यामुळे मला कुणीही येथून काढू शकत नाही, असाही पटलवार ओवैसींनी केला. योगी इथं टपकले. ते आले पण नरेंद्र मोदींची भाषा बोलून गेले. यांना तारीख तर माहिती नाहीच, पण यांचा इतिहासही कच्चा आहे. जर तुम्हाला वाचायला येत नसेल, तर वाचकांना विचारा. जर कधी वाचले असते, तर तुम्हाला लक्षात आले असते की निजाम हैदराबादमधून पळाले नव्हते. त्यांना राजप्रमुख बनविण्यात आले होते. ज्यावेळी भारताचे चीनसोबत युद्ध झाले, त्यावेळी याच निजामाने देशाला सोनं दिलं होतं. योगींच्या उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी 150 मुले इंसेफ्लाइटिसमुळे दगावतात. त्यांच्या रुग्णालायतील मुलांना ऑक्सिजन मिळत नाही आणि ते येथे येऊन भांडणं लावण्याचे काम करतात.