“कोण आहेत राहुल गांधी? मी त्यांना ओळखत नाही”; असदुद्दीन ओवेसींची काँग्रेसवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 10:39 AM2021-12-04T10:39:17+5:302021-12-04T10:40:21+5:30
आगामी दोन ते तीन वर्षांत काँग्रेस फुटेल, असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
नवी दिल्ली: आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यापैकी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. एका कार्यक्रमात बोलताना एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच राहुल गांधींना (Rahul Gandhi) ओळखत नसल्याचे सांगत निशाणा साधला.
ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेसविरहीत आघाडीचे सूतोवाच केले होते. त्यानंतर यासंदर्भात देशभरात चर्चा सुरू झाली असून, अनेक काँग्रेस नेत्यांनी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. यातच आता आजतक आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी यांनी राहुल गांधींना ओळखत नसल्याचे सांगत काँग्रेसवर हल्लाबोल केला.
कोण आहेत राहुल गांधी? मी ओळखत नाही
गेली काही वर्षे काँग्रेससोबत राहिल्याने एक गोष्ट सांगू इच्छितो की, आगामी दोन ते तीन वर्षांत काँग्रेस फुटेल, असा मोठा दावा ओवेसी यांनी यावेळी बोलताना केला. तसेच कोण आहेत राहुल गांधी? मी ओळखत नाही. तो कोण आहे हे तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा, असा खोचक टोलाही लगावला. आम्हाला प्रत्येक पक्षाची बी-टीम म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही राहुल गांधींना इथे बोलावले, तर ते भाजपासारखीच भाषा बोलतील आणि तशीच भाषा अखिलेश यादवही बोलतील, असे ओवेसी म्हणाले.
त्यांनी इतर राज्यांमध्ये लढत राहावे
ममता बॅनर्जी प्रमुख असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष आता पश्चिम बंगालच्या बाहेर पडत त्रिपुरा, गोव्यासह अन्य राज्यांमध्ये विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, त्यांनी इतर राज्यांमध्ये लढत राहावे. आता ममता बॅनर्जी यांना बी-टीम बनवण्यात आले आहे, मी यावर आक्षेप घेतला आहे. बी-टीम असणे हा माझा टॅग आहे. पण आता काँग्रेस त्यांना भाजपाची बी-टीम म्हणत आहे. गोव्यात त्यांचा कसा सामना होईल हे पाहणे मनोरंजक ठरेल, असे ओवेसी यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी असदुद्दीन ओवेसी यांना प्रत्युत्तर दिले. एआयएमआयएमसारखे पक्ष आणि ओवेसींसारखे नेते काँग्रेसने केरळमधून उभे केले. जिथे त्यांनी मुस्लिम लीगशी युती केली, बंगालमध्ये जिथे त्यांनी अब्बास पीरजादा यांच्या पक्षाशी युती केली आणि आसाममध्ये जिथे बद्रुद्दीन अजमलच्या पक्षाशी काँग्रेसने युती केली, असा पलटवार केला.